विशाल पुजारी, कोल्हापूर: बेळगाव येथे आजपासून सुरू होत असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने पाच ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केलाय. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव शहरात प्रवेशबंदी करण्याचा आदेश बजावला आहे.
बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पाच वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने करण्याचं घोषित करण्यात आलेलं. पोलिस आयुक्त मार्टिन यांनी त्या पाचही ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा तीव्र होणार असल्याचे दिसत आहे.
नक्की वाचा: 'मविआ'ला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची दाट शक्यता; केजरीवाल सरकारचा फॉर्म्युला लागू होणार?
महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी घालण्यात आल्यानंतर कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चार नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. शिवसेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, सुनील शिंत्रे, सुनील मोदी या नेत्यांना दोन दिवस बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
या चार शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्था संदर्भात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने बेळगाव प्रशासनाने निर्णय घेतला आहे. पण हे नेते बेळगावला जाण्यावर ठाम आहेत. त्यामुळे कोल्हापूर आणि बेळगाव येथील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते नेताजी जाधव, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर या नेत्यांवर पोलिसांच लक्ष असून त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते बेळगावच्या दिशेने निघाले असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी फिल्डिंग लावली आहे.
महत्त्वाची बातमी: दिल्लीतील जवळपास 40 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, विद्यार्थ्यांसह पालकांची पळापळ