Leopard Attack : महाराष्ट्रभरात बिबट्याची दहशत वाढत आहे. बिबटे माणसांच्या वस्तीत फिरताना दिसत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पुणे, नगर, नागपूर, नाशिक या पट्ट्यात मोठ्या संख्येने बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढला आहे. अशा परिस्थितीत बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.
बीडच्या आष्टीतील किन्ही-बावी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. काल ९ डिसेंबरला रात्रीच्या सुमारास बावी-किन्ही रस्त्यावर तीन बिबटे रस्त्यावरुन फिरताना पाहायला मिळाले. त्याचा तो व्हिडिओ काही नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून सध्या तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बिबट्याचा मुक्त संचार पाहून नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. एका बाजूला बिबट्या गावाच्या आसपास फिरत असल्याचे दृश्य समोर येत आहेत. तर वन विभाग आता पुढे काय कारवाई करणार याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यांमध्ये आहे. बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी काय करता येईल हा प्रश्न उपस्थित होत आहे.
बिबट्या माणूस खात नाही तरीही हल्ला का करतो? l Why do leopards attack humans?
थिंक बँक या युट्यूब चॅनलने वाइल्ड लाइफ मार्गदर्शक, मुख्य वन्यजीव रक्षक सुनील लिमये यांच्याशी बिबट्यांच्या हल्ल्याबाबत मुलाखत घेतली. लिमये यांनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, माणूस हा बिबट्याचं अन्न नाही. बिबट्या कधीच माणूस खात नाही. आता आलेल्या घटनांमध्ये बिबट्याने माणसांवर हल्ला केला, त्याचा चावा घेतल्याच्या बातम्या समोर येतात. कधीही बिबट्या माणसांना खात नाही. बिबट्या हा संधीसाधू आहे. मानवी वस्तीत त्याला कुत्रे, डुक्कर असं अन्न मिळतं. जे मिळणं सोपं असतं. जंगलात अन्न शोधताना बिबट्याला बरीच मेहनत करावी लागते. १० जणांच्या मागे धावला तर कुठे त्याला एकदा अन्न मिळतं. आता हल्ला होणाऱ्या घटना या दुर्देवाने होणाऱ्या घटना आहेत. या दुर्घटना आहेत. बिबट्या आणि माणूस समोरासमोर आल्यानंतर स्वत:च्या बचावासाठी किंवा घाबरुन बिबट्या हल्ला करतो. जिथं सोपं अन्न मिळतं, अशा भागात बिबट्या फिरतो.
जुन्नरच्या हल्ल्यांबद्दल सांगायचं झालं तर ऊसाच्या शेताच्या आसपास बिबटे राहत आहेत. जिथं शेल्टर आहे, पाणी उपलब्ध आहे. तिथे गावातील कुत्रे मिळतात, याशिवाय शेळ्या-मेंढ्याही भूक भागवतात. अन्न मिळणं खूप सोपं आहे. मुंबईतील वन किंवा जंगलाजवळ हीच परिस्थिती आहे. मुंबईत वस्तीच्या आसपास कचरा, कुत्री, डुक्कर असल्याने येथे बिबट्या जास्त वावरतो. त्यामुळे घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा... घराबाहेर दिवे लावणं आवश्यक आहे. बिबट्या इथं येतो हे तुम्हाला माहीत असेल तर माणसांनी हातात काठी ठेवायला हवी, एकटं फिरू नये.. मोठ्याने आवाज करावा... यामुळे बिबट्या अलर्ट होईल आणि तो माणसांच्या समोर येणार नाही आणि हल्ले करणार नाही.