Saamana Editorial News: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात रंगेल व रगेल लोक आले आहेत. या सगळ्यांचा मुहूर्त चुकलेला दिसतो. मंत्र्यांचे उपद्व्याप आणि प्रताप ज्या पद्धतीने समोर येत आहेत ते पाहता लवकरच मंत्रिमंडळाचे पत्ते पिसावे लागतील व पाच ते सहा मंत्र्यांना लाथ मारून घरी बसवावे लागेल, अशी घणाघाती टीका करत सामनामधून राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख?
"फडणवीसांचे सरकार हे कडवट हिंदुत्ववादी वगैरे आहे असे सांगितले जाते. त्यामुळे सत्तेवर येण्याआधी त्यांनी पंचांग पाहून मुहूर्त काढला असेलच. सरकारातील काही जणांनी तर आसामच्या कामाख्या मंदिरात अघोरी पूजा करून सत्तेत प्रवेश केला, पण या सगळ्यांचा मुहूर्त चुकलेला दिसतो. मंत्र्यांचे उपद्व्याप आणि प्रताप ज्या पद्धतीने समोर येत आहेत ते पाहता लवकरच मंत्रिमंडळाचे पत्ते पिसावे लागतील व पाच ते सहा मंत्र्यांना लाथ मारून घरी बसवावे लागेल. राजकीय वर्तुळात अशा मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत. संजय शिरसाट, योगेश कदम, माणिक कोकाटे, दादा भुसे, संजय राठोड व नाशिकच्या 'हनी ट्रॅप'मध्ये अडकलेल्या पाच मंत्र्यांपैकी काहींना जावे लागेल. गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत तशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत" असा दावा सामनामधून करण्यात आला आहे.
Exclusive: 'हनी ट्रॅपबाबत खुलासा होऊन जाऊ द्या',गिरीश महाजन यांचे आव्हान
"महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सध्या जो 'रम, रमा, रमणी'चा खेळ चालला आहे, त्यात भाजपचे मंत्रीही नक्कीच आहेत. गिरीश महाजन यांचा खासमखास प्रफुल लोढा याच्यावर 'हनी ट्रॅप' प्रकरणात गुन्हे दाखल झाले. मुंबई (साकीनाका, अंधेरी पोलीस स्टेशन), नाशिक, जामनेर येथे पोलिसांनी गुन्हे दाखल केले व लोढाच्या घरांवर धाडी घालून त्यांच्याकडील सीडी, पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी शर्थ करीत आहेत. यात सध्याच्या सरकारातील मंत्र्यांची रहस्ये आहेत," असा गौप्यस्फोटही सामनामधून करण्यात आला आहे.
"महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात रंगेल व रगेल लोक आले आहेत. एक मंत्री भर विधानसभेत रमीचा डाव टाकतोय, दुसरा मंत्री पैशांच्या बॅगांचे प्रदर्शन करीत सिगारेट फूंकतोय, तिसरा मंत्री आपल्या प्रेयसीचा खून पचवून फडणवीसांच्या बाजूला बसलाय, चौथा मंत्री नाशिकच्या हनी ट्रॅपच्या सापळ्यातून सुटण्याची धडपड करतोय, पाचवा मंत्री दुसऱ्यांना अडकवत असताना स्वतःच हनी ट्रॅपच्या गुंत्यात फसलाय. 'रम, रमी, रमणी'च्या भानगडीत सरकारचा कोठा झालाय," अशी बोचरी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.