मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्याचे दिसत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईमुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु आहे. सीमेवर सुरु असलेल्या संघर्षामुळे देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अशातच मुंबईमधील सिद्धीविनायक मंदिर समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारत-पाकिस्तानात सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे. याचाच भाग म्हणून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव येत्या रविवारपासून भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई केली आहे. हा नियम आजपासून लागू होणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या निर्णयाला भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले असल्याची माहिती मंदिर प्रशासन देत आहे.
दुसरीकडे, भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साईबाबा मंदिराची सुरक्षा अधिक बळकट करण्यात आली असून उद्या रविवार पासून फुलं, हार आणि प्रसाद तसेच मोबाईल साई मंदिरात नेण्यास सक्त बंदी घालण्यात आली आहे.
भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी उद्या रविवारपासून मंदिरात प्रवेश करताना काही नव्या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे. फुलं, हार आणि प्रसाद मंदिरात नेण्यास बंदी घालण्यात आली असून मोबाईल फोन घेऊन मंदिरात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच तपासणी शिवाय मंदिरात कोणालाही प्रवेश दिली जाणार नसल्याच साई संस्थानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान मध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षमय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानीच्या मंदिर परिसरातही भाविकांच्या आणि मंदिराच्या सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर संस्थान कडून मोठी काळजी घेतली जात आहे. राज्यासह परराज्यातूनही तुळजापुरात येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या मोठी असल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांची आणि त्यांच्या सामानाची सुरक्षा गार्ड्स आणि मेटल डिटेक्टर व बॅग स्कॅनिंग मशीन द्वारे कडक तपासणी करूनच भाविकांना देवीच्या दर्शनासाठी सध्या सोडले जात आहे.