Operation Tiger: 6 खासदांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. पहिल्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच या संभाव्य फुटीमुळे ठाकरे यांच्या नेतृत्वासमोर आजवरचे सर्वात मोठे संकट उभे राहिले असून, पक्षाचे अस्तित्त्व टिकवण्यासाठी आता तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
राज्यातील राजकीय वर्तुळातून समोर आलेल्या अत्यंत विश्वासार्ह सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाच्या एकूण 20 आमदारांपैकी तब्बल 14 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहेत. ही माहिती समोर येताच ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू सरकली असून, या संकटातून मार्ग काढण्यासाठी सोमवारी शिवालय येथे सर्व आमदारांची एक आणीबाणीची बैठक बोलावण्यात आली आहे. यापूर्वी दुपारी देखील या संभाव्य फुटीच्या मुद्द्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अत्यंत महत्त्वाची चर्चा झाली आहे.
महायुती बळकट होणार
एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू असलेले हे विशेष ऑपरेशन यशस्वी होताना दिसत असून, खासदारांपात्रोपाठ आता आमदारांनाही आपल्या बाजूने वळवण्यात त्यांना यश येत असल्याचे चित्र आहे. हे 14 आमदार खरोखरच वेगळा गट करून किंवा थेट शिंदे गटात सामील झाले, तर ठाकरे यांच्याकडे केवळ 6 आमदार उरतील, ज्यामुळे पक्षाला विधानसभा स्तरावरही मोठा फटका बसू शकतो.
( नक्की वाचा : Sanjay Raut: संजय राऊतांच्या 'ऑपरेशन तुडवा'ला शिंदेच्या शिलेदाराचे आव्हान; सुरक्षेसाठी शिवसैनिक बनणार ढाल )
या संपूर्ण राजकीय घडामोडींवर सत्ताधारी पक्षाकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी या संभाव्य पक्षप्रवेशाचे स्वागत केले आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार शिंदे गटात आल्यामुळे महायुतीची ताकद अधिक वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच केंद्र सरकार आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणखी मजबूत होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या प्रगतीला वेग येईल, असे मत त्यांनी मांडले आहे.
विरोधकांचा सरकारवर निशाणा
पक्षामध्ये सुरू असलेल्या या मोठ्या पडझडीवर आणि सत्ताधाऱ्यांच्या रणनीतीवर आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारकडून फक्त फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी सत्ताधाऱ्यांना सल्ला दिला की, त्यांनी फोडाफोडी करण्यापेक्षा प्रशासनावर लक्ष केंद्रित करावे. सध्या देशातील परराष्ट्र धोरणाची परिस्थिती, पाण्याचा प्रश्न, अंतर्गत सुरक्षा आणि वाढती महागाई याकडे सरकारने पाहिले पाहिजे, कारण त्यांना सरकार चालवता येत नाही. भाजपला शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसून केवळ पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला.