Operation Tiger Exclusive Photo: महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरने खळबळ उडवून दिले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदेंच्या गोटात दाखल झाले असून ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. १८ जून रोजी ठाकरेंचे खासदार दिल्लीमधून शिंदेंच्या गोटात दाखल झाले मात्र ते खासदार नेमके कुठे आहेत? त्यांचा मुक्काम कुठं आहे याबाबत अद्याप कोणतीही अपडेट समोर आली नव्हती. आता याबाबतची सर्वात मोठी अपडेट समोर आली असून ऑपरेशन टायगरचा पहिला फोटो समोर आला आहे. दरम्यान, हा फोटो नेमका कधीचा आहे? याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही.
शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. १७ जून रोजी ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख, संजय दिना पाटील, नागेश आष्टीकर, राजाभाऊ वाजे, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर हे दिल्लीमध्ये दाखल झाले होते. दिल्लीमध्ये एका हॉटेलमध्ये या सर्व खासदारांचा मुक्काम होता, तिथून ओमराजे निंबाळकर हे पुण्यात परतले मात्र इतर खासदारांना अज्ञातस्थळी हलवण्यात आले होते.
हे खासदार कुठे आहेत याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. सुत्रांच्या माहितीनुसार, या सर्व खासदारांना जयपूरमधील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. आता या खासदारांचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये ठाकरेंचे खासदार एका आलिशान हॉटेलमध्ये बसल्याचं दिसत आहे. खासदार संजय देशमुख, संजय दिना पाटील, नागेश आष्टीकर हे खासदार या फोटोत दिसत आहेत. दरम्यान, हा फोटो नेमका कधीचा आहे याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.