Maharashtra Politics Operation Tiger: ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह दिल्लीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत असून कालपासून उबाठाचे ४-५ खासदार शिंदेंच्या गोटात गेल्याची माहिती आहे. याबाबत आता मोठी अन् महत्त्वाची अपडेट समोर आली असून ठाकरेंच्या खासदाराचे लोकेशन समोर आले आहे.
ठाकरेंचे खासदार कुठं लपले? लोकेशन समोर
2022 नंतर शिवसेना फुटीचा दुसरा अंक सध्या पाहायला मिळत आहे.शिवसेना ठाकरे गटाच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असून त्याबाबतच्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. बुधवारीच ठाकरेंचे सहा खासदार गुप्तपणे दिल्लीमध्ये दाखल झाले. या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी दिल्याचं सांगण्यात आले. या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर हे मात्र पुन्हा पुण्यात परतल्याने त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.
दुसरीकडे उरलेल्या खासदारांना दिल्लीमधून हलवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. आता या खासदारांचे लोकेशन समोर आले आहे. २०२२ मध्ये शिवसेनेचे बंड झाले तेव्हा गुवाहाटी हे लोकेशन निवडण्यात आलं होते. मात्र यावेळी दुसरं राज्य निवडण्यात आले असून सर्व खासदार जयपूरला असल्याची माहिती आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये ४-५ खासदार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
ठाकरेंचे कोणते खासदार फुटणार?
ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांमध्ये नागेश पाटील आष्टिकर, संजय देशमुख, संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव यांच्या नावाचा समावेश आहे. यापैकी ओमराजे निंबाळकर हे पुण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आज ११ वाजता ठाकरे गटाची संसदीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीला कोणकोणते खासदार उपस्थित राहतात? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.