महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च 2025 मध्ये घेतलेल्या शालांत माध्यमिक अर्थात दहावी (एसएससी) च्या परीक्षेचा निकाल आज (दिनांक 13 मे 2025) जाहीर झाला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 247 माध्यमिक शाळांमधून एकूण 14 हजार 966 एवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 13 हजार 907 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सरासरी निकाल 92.92 टक्के इतका लागला आहे. 89 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, 118 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.
वरळी सी फेस महानगरपालिका माध्यमिक शाळेमधील अक्षरा अजय वर्मा या विद्यार्थिनीने 96.80 टक्के गुण मिळवून महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. द्वितीय क्रमांक गजधर पार्क माणेकजी माध्यमिक शाळेची नंदिनी शगुनलाल यादव या विद्यार्थिनीने 96.20 टक्के गुण प्राप्त करीत पटकावला आहे. तसेच गुंदवली मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेची सेजल शेर बहादूर यादव या विद्यार्थिनीने 95.60 टक्के गुण प्राप्त करीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. मागील वर्षी 90 टक्क्याहून अधिक गुण प्राप्त एकूण 63 विद्यार्थी होते, तर यावर्षी 118 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा मागील तीन वर्षांचा निकाल पाहता मार्च 2023 मध्ये 84.77 टक्के, मार्च 2024 मध्ये 91.56 टक्के तर या वर्षी म्हणजेच मार्च 2025 मध्ये 92.92 टक्के इतका निकाल लागला आहे. मागील वर्षी 79 शाळांचा निकाल 100 टक्के लागला होता. तर, यावर्षी 89 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने यंदा दहावीचा निकाल वृद्धीसाठी नियोजन करुन विद्यार्थ्यांची तयारी करुन घेतली. दहावी परीक्षेच्या धर्तीवर शालेय स्तरावर सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या.
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत दहावी परीक्षा निकाल वृद्धीसाठी नियोजन करुन विद्यार्थ्यांची तयारी करुन घेण्यात आली. महानगरपालिकेने स्वतःची 'मिशन मेरिट' सराव पुस्तिकेची निर्मिती केली आहे. ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिकाधिक गुण प्राप्त होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांचा सराव होण्याकरिता शिक्षणमंडळाच्या धर्तीवर शालेय स्तरावर दहा सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात येतात. सर्व अधिकाऱयांना शाळा दत्तक देवून मार्गदर्शन करण्यात येते. दरमहा दत्तक अधिकारी व मुख्याध्यापकांच्या सभा घेण्यात येतात. निकालवृद्धीबाबत शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. शिक्षणमंडळाच्या नियमकांची व्याख्याने आयोजित केली जातात. विद्यार्थी, शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षणीय यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय साधून वेळोवेळी निकालवृद्धीसाठी सभा घेण्यात येतात.
मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगर सीबीएसई शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 82 टक्के निकाल
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सन 2020-21 मध्ये के पूर्व विभागात मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगर ही सीबीएसई मंडळाची शाळा सुरू करण्यात आली. सदर शाळेत सीबीएसई मंडळाच्या नियमावलीनुसार अभ्यासक्रम सुरू आहे. सन 2024-25 मध्ये सदर शाळेत नैसर्गिक वाढीने इयत्ता 10 वी चा वर्ग होता. त्यामध्ये एकूण 38 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होते. त्यापैकी 13 विद्यार्थी 80 टक्क्यांहून अधिक श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मिशबाह फारुखी या विद्यार्थिनीने 91 टक्के गुण प्राप्त केले आहेत.