राज्यात विचित्र हवामान, कोकण तापलं तर मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Today : कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. त्याचवेळी राज्यातील दुसऱ्या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या पावसाची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
महाराष्ट्रात सध्या विचित्र हवामान आहे.
मुंबई:

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा तडाखा वाढला आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. त्याचवेळी राज्यातील दुसऱ्या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय.  मराठवाडा आणि  विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागानं सोशल मीडिया नेटवर्क X वर पोस्ट करत दिली आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. 

मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव तर विदर्भातील अमरावती, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी वादळी वारे तसंच विजांचा गडगडाट होईल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलीय. काही आठवड्यांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. पावसाचा जोर आता कमी झाला असला तरी अजूनही तो ओसरलेला नाही, हे हवामान विभागाच्या ताज्या अंदाजावरुन स्पष्ट झालं आहे.

Advertisement

मुंबईला यलो अलर्ट...

येत्या दोन दिवसात मुंबईतील तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला असून आज आणि उद्या मुंबईतील तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. रविवारी मुंबई उपनगरातील अनेक भागात उन्हाचा पारा चाळीशीपार गेला होता.  

Advertisement

( नक्की वाचा : हिल स्टेशन झाले HOT; मुंबईलाही Heat wave चा इशारा )
 

काय काळजी घ्याल?

- तहान लागली नसली तरीही पाणी पित राहा.
- प्रवासादरम्यान पिण्याचं पाणी सोबत ठेवा.
- ORS चं पाणी प्या, लिंबू पाणी, ताक-लस्सी, फळांचा रस, नारळाचं पाणी यांसारख्या पेयांचं आहारातील प्रमाण वाढवा.
- पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे वापरा.
- थेट सुर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर साधनांचा वापर करा.
- उन्हात बाहेर जाताना चप्पल वा शूज वापरा.
- भारतीय हवामान विभागाचे संकेतस्थळ https://mausam.imd.gov.in/ येथून हवामानाची अद्ययावत माहिती घ्या.
- थेट सुर्यप्रकाशाच्या लाटा रोखण्यासाठी दिवसा खिडक्यांवर पडदे लावा. 
- घराबाहेर कामे शक्यतो सकाळ किंवा सायंकाळी उरकून घ्या. आवश्यकता नसेल तर दुपारी घराबाहेर जाणं टाळा. 

( नक्की वाचा : देशाला Heat wave चा धोका; काय काळजी घ्याल? एका क्लिकमध्ये समजून घ्या! )