परभणी: परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती, ज्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केले होते. यामध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीमध्येच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस कोठडीमध्ये हार्ट अटॅकने या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, परभणी जिल्हा कारागृहामध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या इसमाचा छातीत तीव्र वेदना झाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर शहरातील तणावांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान ताब्यात घेतले होते. सोमनाथ याचा मृत्यू झाल्यानंतर शहरात ठीक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याप्रकरणी नांदेड पोलीस अधिक्षक शहाजी उमप यांनी दिलेल्या माहितीवरुन पुण्यातील भोसरी येथील सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या मृत व्यक्तीला जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी नानल पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सीआयडीकडे सोपविण्यात येणार आहे.
सोमनाथ हा परभणीत वकिलीचे शिक्षण घेत होता, अशी माहिती समोर आली होती. याबाबतही पोलिसांनी अधिकृत तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच अटकेवेळी नोंद केलेल्या माहितीनुसार मोंढा परिसरातील शंकरनगर येथे भाड्याने राहणाऱ्या घरात "कामगार" होता, असंही सांगण्यात येत आहे.
दंगली प्रकरणी इतर आरोपींसह सोमवारी त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. सोमनाथचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची बातमी सकाळी ७ च्या सुमारास आली. रविवारी मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.
यावरुन आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या असून हा घातपात असल्याचा संशयही व्यक्त केला होता. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू वेदनादायी असून पोस्टमॉर्टमचे चित्रीकरण करावे, अशी मागणी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.