Manoj Jarange Patil Health Update: मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्या दिवशी आझाद मैदानवरील उपोषण सोडलं. त्यानंतर मनोज जरांगे यांना रुग्णवाहिकेतून थेट छत्रपती संभाजी नगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री साडेबारा वाजता म्हणून जरांगे हे गॅलेक्सी रुग्णालयात पोहोचले. याच रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातच्या मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावरील उपोषण सोडले. आरक्षणाच्या लढाईसाठी जरांगे पाटील हे आझाद मैदानावर पाच दिवसांपासून उपोषणास बसले होते. पाचव्या दिवशी त्यांनी सरकारचा नवा प्रस्ताव मान्य करत उपोषण सोडत असल्याचे जाहीर केले.
डॉक्टरांनी काय सांगितलं?
पाच दिवसांपासून उपोषण, पोटात अन्न आणि पाण्याचा कणही नसल्याने मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली होती. डॉक्टरांकडून त्यांना अनेकदा उपचार घेण्याची विनंती केली मात्र त्यांनी नकार दिला होता. आता आरक्षणाचा लढा जिंकल्यानंतर आणि उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांना तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती सांगितली आहे. "पाच दिवसांपासून उपोषण तसेच सततच्या प्रवासामुळे आठवडाभर जरांगे पाटील यांचे उपोषण झालं आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना चक्कर येत होती, पोटही दुखत होते. त्यांचा बीपी 96 आहे तर शुगर मुंबईत तपासली तेव्हा ७० होती. एकंदरीत त्यांची तब्येत थोडीशी नाजूक आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु केले असून इतर तपासणीही केली जात आहे," असं डॉक्टर म्हणाले.
"मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुढील दोन आठवडे उपचार करण्यात येणार आहेत. त्यांना पुढील १५ दिवसात कोणत्याही दौऱ्यासाठी वगेरे बाहेर पडता येणार नाही, असंही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच मराठा बांधव भेटीसाठी रुग्णालयात येत आहेत.