'एवढा पैसा कुठून आला काका?' नातवाला TESLA गिफ्ट देणाऱ्या प्रताप सरनाईकांना मराठी अभिनेत्याचा सवाल!

Astad Kale Vs Pratap Sarnaik: आजोबांनी आपल्या नातवाला दिलेल्या या आलिशान गिफ्टची चांगलीच चर्चा होत आहे. अशातच मराठी अभिनेता अस्ताद काळे याने या खरेदीवरुन थेट प्रताप सरनाईक यांनी काही सवाल केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

 Actor Astad Kale Post on Pratap Sarnaik bought Tesla Car: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वीच आलिशान टेस्ला कार खरेदी केली. तब्बल ६० ते 70 लाख एवढी किंमत असलेली टेस्ला गाडी खरेदी करणारे ते भारतातील पहिलेच व्यक्ती आहेत. आपल्या नातवासाठी ही गाडी आपण गिफ्ट देत असल्याचंही त्यांनी सांगितले. आजोबांनी आपल्या नातवाला दिलेल्या या आलिशान गिफ्टची चांगलीच चर्चा होत आहे. अशातच मराठी अभिनेता अस्ताद काळे याने या खरेदीवरुन थेट प्रताप सरनाईक यांनी काही सवाल केले आहेत.

आस्ताद काळे हा मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार भूमिकांप्रमाणेच तो रोखठोक स्वभावामुळेही चर्चेत असतो. अनेक विषयांवर तो आपली मते परखडपणे मांडत असतो. सध्या आस्ताद काळेने प्रताप सरनाईक यांच्या टेस्ला खरेदीवरुन केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने गाडीच्या खरेदीवरुन थेट परिवहन मंत्र्यांनाच सवाल केले आहेत.

काय आहे आस्ताद काळेची पोस्ट?
"त्या नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLAरूपी खेळण्याची किंमत किती आहे हो काका?? आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, कर भरणाऱ्या तरीही खड्ड्यांमधून आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली वाहनं चालवावी लागणाऱ्या आमच्यासारख्या नागरिकांच्या जीवाची किंमत किती आहे हो काका?  १) एवढा पैसा आला कुठून काका? २)तुमच्या लाडक्या नातवाला ते खेळणं घोडबंदर रस्त्यावरून न्यायला सांगा ना. बाकी लाल दिव्यांचा ताफा बरोबर न घेता."  असं आस्ताद काळे याने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

काय म्हणाले होते प्रताप सरनाईक?

पुढील १० वर्षात एक वेगळी क्रांती या राज्यामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही.  टेस्ला ही इंटरनॅशनल ब्रँड आहे. तो बँड मुंबईमध्ये आम्ही केले. त्यांचे वाय मॉडेल हे सर्वोत्तम आहे. हीच गाडी मी घेतली.  देशामध्ये पहिली गाडी ही महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांची आहे. मी माझ्या नातवासाठी ही गाडी घेत आहे. भविष्यामध्ये पर्यावरण पुरक गाड्या वाढवण्याकडे आमचा भर आहे. मला असं वाटतं की संसारामधील कुठलाही व्यक्ती असेल नातवंडांचे जे सुख आहे ते इतर कुणालाही लाभू शकत नाही.  माझ्या नशिबाने तीन तीन  नातवंड आहे. त्यांच्या माध्यमातूनच ही गाडी त्यांना दिली तर बरं होईल, असं प्रताप सरनाईक म्हणाले होते. 
 

Advertisement