Kamli Serial Promo Released At Times Square: मराठी टेलिव्हिजनवर सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत. यापैकीच झी मराठी वाहिनीवरील कमळी मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. गावाकडची कमळी शहरातील मुलींविरुद्ध कसं बंड करते.. अशा आशयाच्या या मालिकेला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अशातच आता कमळी मालिकेबाबत एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून या मालिकेचा प्रोमो चक्क न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे.
अभिनेत्री विजया बाबर (Vijaya Babar) आणि निखील दामले यांच्या भूमिका असलेली कमळी मालिकेने नवा इतिहास रचला आहे. कमळी या मालिकेचा स्पेशल प्रोमो चक्क न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच या प्रोमोचा खास व्हिडिओही शेअर केला आहे. या ऐतिहासिक क्षणानंतर प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिक्रिया देत कमळी म्हणजेच विजया बाबरचे कौतुक केले आहे.
झी मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजवर याचा खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तसेच कमळीने रचला इतिहास! मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच एका मालिकेचा प्रोमो अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील टाईम्स स्क्वेअरवर झळकावण्यात आला आहे, अशी माहिती देत थक्क झाली न्यूयॉर्क नगरी, टाईम्स स्क्वेअरवर झळकली कमळी, असा खास कॅप्शनही दिला आहे. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, कमळी या मालिकेत विजया बाबर (कमळीची भूमिका), निखिल दामले (ऋषीची भूमिका), आणि केतकी कुलकर्णी (अनिकाची भूमिका). याव्यतिरिक्त, इला भाटे (अन्नपूर्णा महाजन), आशा शेलार (कामिनी), सारिका नवाथे (नयनतारा इनामदार), सुषमा मुरुडकर (रागिणी महाजन), आणि अनिकेत केळकर (राजन महाजन) यांसारखे दिग्गज कलाकार आहेत.