Marathwada Mukti Sangram Day Speech : छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, जालना, धाराशीव, बीड, परभणी आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांचा राज्यातील विभाग म्हणजे मराठवाडा. या भागाच्या विकासाचा अनुशेष बाकी असल्याची तक्रार वारंवार केली जाते. या विषयावर सरकारी पातळीवर आजवर अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत. विकासाच्या बाबतीत अनुशेष असलेल्या मराठवाड्याला देशात विलिनीकणासाठी प्रतीक्षा करावी लागली.
15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण, मराठवाड्याला निजामाच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी आणखी 13 महिने वाट पाहावी लागली. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निझामाच्या राजवटीतून मुक्त झाला. त्याचे स्मरण दरवर्षी या दिवशी केले जाते. मराठवाडा मुक्ती संग्रमाचा इतिहास हा प्रेरणादायी आहे.
हा प्रेरणादायी इतिहास सर्वांना माहिती व्हावा म्हणून त्या दिवशी राज्यभर वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. या दिवशी शाळेत भाषण करण्यासाठी प्रमुख मुद्दे आणि त्या मुद्यांचा विस्तार करणारं नमुना भाषण आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासाठी भाषणाचे प्रमुख मुद्दे आणि विस्तार
१. प्रस्तावना: मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महत्त्व
भाषणाची सुरुवात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देऊन करा.
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यासाठी का महत्त्वाचा आहे, हे सांगा. हा दिवस केवळ एक सुट्टी नसून मराठवाड्याच्या स्वातंत्र्य आणि अस्मितेचे प्रतीक आहे.
भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी, मराठवाडा मात्र अजूनही हैदराबादच्या निजामाच्या हुकुमशाही राजवटीखाली होता, हे स्पष्ट करा.
२. निजामाची जुलमी राजवट
निजामाच्या राजवटीत जनतेवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल माहिती द्या.
मराठी भाषा, संस्कृती आणि शिक्षण यांचा कसा द्वेष केला जात होता, हे सांगा.
जनतेला स्वातंत्र्य, समान हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कसा अभाव होता, यावर प्रकाश टाका.
३. लढा आणि चळवळीची सुरुवात
या जुलमी राजवटीविरोधात कसे आंदोलन उभे राहिले, हे सांगा.
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यांनी कसा संघर्ष सुरू केला, हे सांगा.
मराठवाडा मुक्ती संग्रामात जनतेचा सहभाग कसा होता, हे सांगा. यात शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला आणि अगदी तरुण पिढीही कशी सामील झाली, हे सांगा.
( नक्की वाचा : Gopal Patha : 'Bengal Files'मधील ‘तो' चेहरा; 1946 च्या हिंसाचारात कलकत्ताचे तारणहार ठरलेले ‘गोपाळ पाठा' कोण? )
४. रझाकारांचे क्रूर अत्याचार
रझाकार संघटनेबद्दल सांगा. कासिम रझवी याच्या नेतृत्वाखालील ही संघटना कशी क्रूर आणि हिंसक होती, हे सांगा.
रझाकारांनी जनतेवर केलेले अत्याचार, जाळपोळ, खून आणि लूटमार या घटनांचे वर्णन करा. हे अत्याचार मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला अधिक तीव्र करण्यास कारणीभूत ठरले.
५. सरदार वल्लभभाई पटेल आणि ‘ऑपरेशन पोलो'
भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेचे महत्त्व सांगा.
त्यांनी हैदराबादच्या निजामाला भारतात विलीन होण्याचा आग्रह कसा केला, हे सांगा.
निजाम तयार नसल्यामुळे, त्यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी ‘ऑपरेशन पोलो' सुरू करण्याचा कसा निर्णय घेतला, हे सांगा.
६. भारतीय सैन्याची भूमिका
भारतीय लष्कराने या मोहिमेत बजावलेल्या भूमिकेचे वर्णन करा.
केवळ पाच दिवसांत भारतीय लष्कराने निजामाचा पराभव कसा केला, हे सांगा. हे लष्करी ऑपरेशन अत्यंत कमी वेळात यशस्वी झाले.
भारतीय सैन्याच्या शौर्यामुळे मराठवाडा स्वतंत्र झाला, ही गोष्ट आवर्जून सांगा.
७. 17 सप्टेंबर 1948: मराठवाडा मुक्ती दिन
17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा कसा स्वतंत्र झाला, हे सांगा.
हा दिवस मराठवाड्याच्या जनतेसाठी नव्या युगाची सुरुवात कशी होती, हे सांगा.
स्वातंत्र्याचा सूर्य कसा उगवला आणि मराठवाड्यातील जनतेच्या स्वप्नांना कसे पंख मिळाले, हे स्पष्ट करा.
८. स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान
या संग्रामात ज्यांनी आपले प्राण गमावले, त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करा.
स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, विजयेंद्र काबरा यांसारख्या नेत्यांचे आणि अनेक अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान कसे अमूल्य आहे, हे सांगा.
त्यांच्या त्याग आणि बलिदानामुळेच आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे, ही जाणीव करून द्या.
९. मराठवाड्याची आजची प्रगती
मराठवाडा मुक्ती मिळाल्यानंतर आज कसा विकसित झाला आहे, हे सांगा.
शिक्षण, कृषी, उद्योग आणि इतर क्षेत्रांतील प्रगतीचा उल्लेख करा.
आजही मराठवाडा विकासाच्या अनेक आव्हानांना सामोरे जात आहे, पण स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन पुढे जात आहे, हे सांगा.
१०. समारोप आणि आवाहन
भाषणाचा समारोप करताना, स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाला आदराने वंदन करा.
आपणही आपल्या मराठवाड्याच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी कसे योगदान देऊ शकतो, याचे आवाहन करा.
आपल्या भाषणाचा शेवट "जय हिंद! जय महाराष्ट्र! जय मराठवाडा!" या घोषणेने करा.
Marathwada Mukti Sangram Day Speech : मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी शाळेत करण्यासाठी संपूर्ण भाषण
प्रिय मित्रांनो आणि शिक्षकांनो,
आज 17 सप्टेंबर, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. हा दिवस केवळ एक सुट्टी नसून, मराठवाड्याच्या स्वातंत्र्य आणि अस्मितेचे प्रतीक आहे. आजपासून 77 वर्षांपूर्वी, याच दिवशी मराठवाड्याने हैदराबादच्या जुलमी निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात प्रवेश केला. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असले, तरी मराठवाड्याला मात्र त्यासाठी आणखी 13 महिने संघर्ष करावा लागला. हा संघर्ष, हा त्याग आणि हे बलिदान आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
या स्वातंत्र्यसैनिकांना क्रूर रझाकारांच्या अत्याचारांना सामोरे जावे लागले. कासिम रझवीच्या नेतृत्वाखालील रझाकारांनी केलेल्या जाळपोळ, खून आणि अत्याचारांमुळे मराठवाड्याची भूमी रक्तरंजित झाली. पण या जुलुमापुढे न झुकता, मराठवाड्याच्या जनतेने आपला लढा अधिक तीव्र केला.
या वेळी, भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी निजामाला भारतात विलीन होण्यास सांगितले, परंतु तो तयार झाला नाही. शेवटी, जनतेवरील अत्याचार थांबवण्यासाठी 13 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन पोलो' सुरू केले. भारतीय सैन्याच्या शौर्यापुढे निजामाचे सैन्य आणि रझाकार फार काळ तग धरू शकले नाहीत. केवळ पाच दिवसांच्या संघर्षानंतर, 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून पूर्णपणे स्वतंत्र झाला आणि खऱ्या अर्थाने भारताचा अविभाज्य भाग बनला.
( नक्की वाचा : हैदराबादला स्वतंत्र मुस्लीम देश बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या निजामानं कशी पत्करली शरणागती? )
हा विजय केवळ लष्करी पराक्रम नव्हता, तर मराठवाड्यातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या त्याग आणि बलिदानाचा तो गौरव होता. स्वामी रामानंदर तीर्थ गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे आणि असंख्य अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत. त्यांच्या बलिदानामुळेच मराठवाड्याचा आजचा विकास शक्य झाला.
आजचा दिवस आपल्याला त्यांच्या त्यागाची आठवण करून देतो. आपण त्यांच्या स्वप्नातील मराठवाडा घडवण्यासाठी एकत्र येऊन काम करूया. जय हिंद! जय महाराष्ट्र! जय मराठवाडा!