आषाढी वारीसाठी पंढरपूर शहर आणि परिसरात तब्बल दहा दिवस मांसविक्रीला बंदी असणार आहे. आषाढी एकादशीच्या अगोदर सात दिवस आणि नंतर तीन दिवस असे दहा दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचा मोठा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायाची पंढरपूरच्या वारीत मांस विक्री बंद ठेवण्याची मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पूर्ण केल्याचं दिसून येत आहे.
आजपासून वारी मार्गावरील मद्य आणि मांसाची दुकानेही बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर घेण्यात आला आहे. आता तर पंढरपुरात दहा दिवस म्हणजे आषाढी वारी सुरू होण्याच्या सात दिवस आधी आणि नंतरचे तीन दिवस असे दहा दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पालखी मार्गावरील मद्य आणि मांसविक्रीला बंदी..
पालखी सोहळा ज्या ज्या मार्गाने जातील त्या गावांमध्ये तो संपूर्ण दिवस मद्य आणि मांस विक्री बंद ठेवण्यात यावी. यात्रा कालावधीत पंढरपूर परिक्षेत्रात मद्य-मांस विक्री बंद ठेवण्यात यावी आणि व्हीआयपी वाहनांना बंदी घालण्यात यावी अशा तीन मागण्या भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या होत्या. त्या तत्काळ मान्य करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागीय आयुक्त, पुणे यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आता प्रशासनाने आजपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या आदेशानंतर आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.