मनोज सातवी, मीरा भाईंदर:
Mira Bhayandar News: मीरा-भाईंदरमध्ये 'मराठी महापौर'च हवा यासाठी राजकारण तापू लागले आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी मराठीच महापौर हवा, अन्यथा रक्त सांडेल.. असा इशारा दिल्यानंतर पुन्हा एकदा 'मराठी महापौर' मागणीसाठी मराठी एकीकरण समिती, मनसे, ठाकरे सेना काँग्रेस सह इतर संघटनांनी उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.
मीरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मीरा-भाईंदरमध्ये आता मराठी महापौराच्या मागणीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. भाजप वगळता सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सामाजिक संस्थांनी थेट पोलिसांकडे धाव घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. 'मराठी महापौर झाला नाही तर येत्या २ तारखेला उग्र आंदोलन करू', असे निवेदन मराठी एकीकरण समिती आणि मनसेने सह इतर पक्ष आणि संघटनांनी पोलीस उपायुक्तांना दिले आहे.
टोकाचा संघर्ष करु..
दरम्यान, मीरा भाईंदरमध्ये मराठीसाठी संघर्ष करावा लागला तर कोणत्याही थराला जावू. हे शहर अत्यंत शांतताप्रिय आहे. त्या शांततेला गालबोट लागू नये, याची काळजी त्यांनी घ्यावी, असा इशारा या निवेदनादरम्यान देण्यात आला आहे. शहराच्या राजकारणात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, स्थानिक नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात शहरात याचे मोठे पडसाद उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.