MNS Mira Bhayandar Morcha: मीरा भाईंदरमध्ये मनसेने पुकारलेल्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. मंगळवारी पहाटेपासून मनसे नेत्यांची धरपकड सुरु असून अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले आहे तसेच अनेक मनसे नेत्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. एकीकडे मनसे नेत्यांची धरपकड सुरु असतानाच आता मनसेकडून कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणार, अशी भूमिका घेण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज निषेध पदयात्रा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला मनसेसोबत, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, मराठी एकीकरण समिती तसेच समविचारी संस्था, संघटना मधील गराठी भाषिक यांनी पाठींबा दिलेला आहे. मात्र या मोर्चाआधीच मनसे नेत्यांची धरपकड सुरु असून परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आत्तापर्यंत अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनीही पोलिसांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
राज्यभरातील मनसैनिक मुंबईत धडकणार!
मिरारोडमधील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता मुंबईसह महाराष्ट्रातील मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. मनसेकडून राज्यभरातील नेते, कार्यकर्त्यांना मीरा भाईंदरमध्ये पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मोर्चाचे नेतृत्व सामान्य मराठी माणूस करेल, पण कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणार आहे, असा इशाराच संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिला आहे.
गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी मिळते मात्र मराठी माणसांचा मोर्चा निघत नाही. सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. महाराष्ट्रात मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करण्याचे षडयंत्र आहे. मात्र हा मोर्चा निघणार आहे. आता महाराष्ट्रातला मराठी माणूस मीरा-भाईंदरच्या दिशेने निघाला आहे. आम्हाला पाहायचं आहे जेलची क्षमता जास्त आहे की मराठी माणसाची संख्या जास्त आहे, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.