Monsoon Date 2026: तीव्र उन्हाने होरपळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि चातकासारखी पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी एक आनंदाची आणि सुखावणारी बातमी आहे. यंदाचा मान्सून वेळेपूर्वीच देशात हजेरी लावणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केलेल्या नवीन अंदाजानुसार, नैर्ऋत्य मोसमी वारे यंदा २६ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहेत.
मान्सूनची दमदार एन्ट्री होणार!
नेहमी मान्सून १ जून रोजी केरळात येतो, पण यंदा तो ६ दिवस आधीच येत असल्याने देशातील पावसाळा लवकर सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या देशभरात 'एल-निनो'च्या प्रभावामुळे यंदा पाऊस कसा होणार, याबद्दल चिंतेचे वातावरण होते. मात्र, हवामान विभागाच्या या ताज्या अंदाजाने चिंतेचे ढग दूर झाले आहेत. मान्सूनच्या आगमनामुळे केवळ तीव्र उष्णतेपासून सुटका होणार नाही, तर खरीप हंगामाच्या पेरण्याही वेळेत सुरू करता येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार बॅटिंग
मुख्य भूमीवर मान्सून पोहोचण्याआधीच केरळमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने १५ मे रोजी केरळच्या इडुक्की आणि मलप्पुरम जिल्ह्यांत 'ऑरेंज अलर्ट' तर कोट्टायम, थ्रिस्सूर, वायनाडसह आठ जिल्ह्यांत 'येलो अलर्ट' जारी केला आहे. दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढल्यामुळे मान्सूनच्या प्रगतीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या शुष्क हवामानाकडून आता निसर्ग पावसाळ्याकडे झुकू लागला आहे, हीच यंदाच्या मान्सूनची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे.
( नक्की वाचा : NEET Paper Leak: बाप आरोपी अन् घरात 5-5 डॉक्टर; नीट पेपर लीक प्रकरणातील 'या' कुटुंबाचं धक्कादायक वास्तव )
गेल्या काही वर्षांतील मान्सून आगमनाचा प्रवास:
२०२०: १ जून (अंदाज ५ जून)
२०२१: ३ जून (अंदाज ३१ मे)
२०२२: २९ मे (अंदाज २७ मे)
२०२३: ८ जून (अंदाज ४ जून)
२०२४: ३० मे (अंदाज ३१ मे)
२०२५: २४ मे (अंदाज २७ मे)