कामं नाही केवळ फोडाफोडीचं राजकारण, राहुल शेवाळेंचं मतदारसंघाकडे दुर्लक्ष; निवडणुकीपूर्वी मतदारांनी मांडली व्यथा

राहुल शेवाळे हे मतदारसंघात कधी फिरकलेच नाही, धारावी-अणुशक्तीनगरसारख्या झोपडपट्टी भागात त्यांनी काहीच काम केलं नसल्याचं, दक्षिण मध्य मुंबईतील मतदारांनी सांगितलं.

जाहिरात
Read Time: 3 mins

मुंबई : मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव देणारे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचं स्वत:च्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं आहे.  दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील नागरिकांनी आपली व्यथा मांडली. गेल्या ५ वर्षात मतदारसंघातील बदल सोडा, स्वत: खासदार राहुल शेवाळे आम्हाला दिसले नसल्याचे मतदारांनी सांगितलं. या विभागात रहदारीसाठी चांगले रस्ते नाहीत, खासदारांनी केवळ फोडाफोडीचं राजकारण केलं, असं सांगत मतदारांनी संताप व्यक्त केला. 

अनिल भंडारे मांटूगा लेबर कॅम्प भागात राहतात. गेल्या 5 वर्षात खासदारांनी  केलेला बदल सोडा, आम्हाला खासदारच दिसले नाहीत. आमच्या भागात ते फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटतात आणि निघून जातात. जनतेच्या प्रश्नासाठी  येत नाहीत. महाराष्ट्राला फुले-शाहू आंबेडकरी विचारांचा वारसा लाभलेला आहे.  अशा महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण अजिबात मान्य नाही. हा महाराष्ट्राला लागलेला काळिमा आहे, अशी भावना अनिल भंडारे यांनी व्यक्त केली. शिवाजी पार्क किंवा एखाद्या उच्चभ्रू वस्तीत सुशोभीकरणाव्यतिरिक्त धारावी, चेंबूर, गोवंडी, अनुशक्ती नगर, माटुंगा लेबर कॅम्प यांसारख्या भागांत त्यांनी गेल्या पाच वर्षात फारसं लक्ष दिलेलं नाही, असंही ते पुढे म्हणाले. 

सायन कोळीवाडा परिसरात राहणारे रामसुमेर जैस्वार यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, २०१९ च्या निवडणुकीनंतर या भागात राहुल शेवाळे यांना अद्याप पाहिलेलं नाही. त्यांनी एकदाही भेट दिलेली नाही. महाराष्ट्रातले नेते राजकारणात फक्त पैसे कमवायला येतात आणि आपलं पोट भरतात. त्यांना पक्ष आणि विचारधारणेशी काही घेणं देणं नसतं, ते काही पैशांसाठी पक्षही बदलायला तयार होतात.

माटूंगा लेबर कॅम्पमध्ये राहणारे सुरेश सावंत यांनी तर राहुल शेवाळे यांनी केलेल्या रेल्वे स्थानकांच्या नामकरणाच्या मु्द्द्यावरुन सवाल उपस्थित केला. 'आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून दादर स्टेशनचं नाव चैत्यभूमी करा, अशी मागणी करत आहोत. याकडे राहुल शेवाळेनी लक्ष दिलं असतं तर ते काम पटकन झालं असतं. पण त्यांनी दुर्लक्षित केलं, असं सुरेश सावंत यावेळी म्हणाले. शेवाळेंनी आमच्या भागातील शाळेतील कामं केली नाही. मनुवाद्यांविरोधात लढण्यासाठी आम्ही राहुल शेवाळेंना निवडून दिलं होतं, परंतू आता तेच मनुवाद्यांसोबत गेले, असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. 

Advertisement

दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे मतदारवर्ग नाराज...
राहुल शेवाळे यांनी मूळ पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे मतदारवर्ग नाराज आहे. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील नागरिकांना फोडाफोडीचं राजकारण पटलं नाही आणि या कारणामुळे या मतदारसंघातील लोक शेवाळेंवर नाराज असल्याचं या भागातील लोकांशी संवाद साधल्यानंतर स्पष्ट झालं. राहुल शेवाळे हे मतदारसंघात कधी फिरकलेच नाही, धारावी-अणुशक्तीनगरसारख्या झोपडपट्टी भागात त्यांनी काहीच काम केलं नसल्याचं, दक्षिण मध्य मुंबईतील मतदार प्रवीण धोत्रे यांनी सांगितलं. 

पंडित दूनबळेदेखील याच मतदासंघात राहतात. त्यांना राहुल शेवाळेंच्या कामाबद्दल विचारलं असता ते म्हणाले, राहुल शेवाळे अनुसूचित जातींच्या मतांवर निवडून आले. परंतू त्यांनी या समाजासाठी काहीच कामं केली नाहीत. या समाजातील तरुणांच्या शिक्षणावरही लक्ष दिलं नाही. केवळ फोडाफोडीचं राजकारण केलं. काहींच्या मते ईडीला घाबरून त्यांनी पक्ष बदलला, मात्र तरीही त्यांनी असं करणं योग्य नव्हतं. 

Advertisement