MPSC Exam Big Update: महाराष्ट्रातील 3 लाख विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही परीक्षा 28 सप्टेंबर, 2025 ऐवजी 09 नोव्हेंबर, 2025 रोजी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळाला आहे."
का पुढे ढकलली परीक्षा?
एमपीएससीने (MPSC) जारी केलेल्या पत्रकानुसार, ही परीक्षा 28 सप्टेंबर, 2025 रोजी राज्यातील 37 जिल्हाकेंद्रांवरील 524 उपकेंद्रांवर होणार होती. मात्र, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने विविध गावं आणि तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.
यासोबतच, हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या विनंतीवरून आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
( नक्की वाचा : Mumbai Local : मध्य रेल्वेचा मोठा दिलासा! दोन नवी स्टेशन आणि 20 अतिरिक्त लोकल लवकरच सेवेत, वाचा संपूर्ण प्लॅन )
MPSC परीक्षेची जुनी आणि नवी तारीख
जुनी तारीख: 28 सप्टेंबर, 2025
नवी तारीख: 09 नोव्हेंबर, 2025
विद्यार्थ्यांची संख्या आणि भरली जाणारी पदे
या परीक्षेसाठी राज्यभरातील लाखो विद्यार्थी तयारी करत आहेत.
एकूण पदे: महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण 385 पदांसाठी ही पूर्व परीक्षा होत आहे. (यामध्ये 35 पैकी 9 संवर्गातील पदांचा समावेश आहे.)
विद्यार्थी संख्या: अंदाजे 3 लाख विद्यार्थी राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल
राज्याच्या काही भागांत पडत असलेला जोरदार पाऊस आणि पूर परिस्थिती यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचू शकणार नाहीत, तसेच या नैसर्गिक आपत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही परिणाम होत होता. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन, परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी आयोगाकडे केली होती. अखेर, विद्यार्थ्यांच्या या मागणीची दखल घेत एमपीएससीने (MPSC) हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
गट-ब परीक्षेच्या तारखेतही बदल
एमपीएससीने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही आता 09 नोव्हेंबर, 2025 रोजी होणार असल्याने, याच दिवशी नियोजित असलेली महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 च्या तारखेतही बदल करण्यात येईल. गट-ब परीक्षेचा सुधारित दिनांक लवकरच एका स्वतंत्र शुद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येईल.