मुंबई: काँग्रेस मुंबईतील आगामी बीएमसी निवडणूक महा विकास आघाडीतून स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करत आहे. असे झाल्यास, अल्पसंख्याक मतांच्या विभाजनाचा फायदा भाजपला मिळू शकतो. भाजपने महायुती आघाडीत राहून बीएमसी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी दिल्लीत काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली.
ज्यात महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांसोबतच महाराष्ट्र राज्य प्रभारी रमेश चेन्निथला आणि सरचिटणीस मुकुल वासनिक उपस्थित होते. बैठकीत महाराष्ट्रातील नेत्यांनी पक्षनेतृत्वाला ठामपणे सांगितले की मुंबईत काँग्रेसला मजबूत करायचे असेल तर स्वबळावर निवडणूक लढवणे आवश्यक आहे. 2017 साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला 227 पैकी फक्त 31 जागा जिंकता आल्या होत्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाविकास आघाडीत तीन प्रमुख घटक पक्ष आहेत - उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT), काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस. सीपीआय आणि समाजवादी पक्षाची मुंबईतील स्थिती ही तोळामासाची आहे. एकेकाळी मुंबई महापालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व होते, कालांतराने शिवसेनेने त्यांचे वर्चस्व कमी करत आपले मुंबईतील स्थान मजबूत केले होते. मुंबई महापालिकेत शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष बरीच वर्ष बलशाली पक्ष राहीले आहेत. 2019 साली महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, या तीन पक्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढल्या होत्या, ज्याचा त्यांना काही प्रमाणात फायदाही झाला.
महाविकास आघाडीत सामील झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा बदलली. आघाडीच्या प्रस्तावनेत दोनदा "सेक्युलर" या शब्दाचा उल्लेख करण्यात आला होता. सेक्युलरवादाला विरोध करणाऱ्या शिवसेनेने ती प्रस्तावना स्वीकारली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपले हिंदुत्व हे सर्वसमावेशक आहे असे म्हणत टोकाचामुस्लिम विरोध मवाळ केला. याचा ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत चांगला फायदा झालेला पाहायला मिळाला. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्यांक समाजाने ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे दिसले. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही उद्धव यांच्या पक्षाच्या उमेदवारांना मुस्लिम बहुल मतदारसंघात चांगली मते मिळाली होती.
NCP News: शरद पवारांना आणखी एक दणका, आता 'हा' नेताही साथ सोडणार, 'घड्याळ' हाती बांधणार
आता जर काँग्रेस आणि शिवसेना (UBT) वेगवेगळ्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेणार असतील, तर मुस्लिम मतांचे विभाजन निश्चित आहे. अनेक मुस्लिम बहुल भागात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आपल्या शाखा स्थापन केल्या आहेत. याशिवाय समाजवादी पक्ष आणि ओवेसींचा एआयएमआयएम (AIMIM) देखील आक्रमकपणे मुस्लिम व्होट बँकेवर दावा ठोकत आहेत. मुस्लिम मतांच्या या विभाजनाचा थेट फायदा भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून तयार केलेल्या महायुतीला मिळू शकतो.
काँग्रेसच्या स्वतंत्र निवडणूक लढवायचे ठरवले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुस्लिम मतांना मुकावे लागू शकते, परंतु त्यांच्या पक्षाला आशा वाटते आहे की राज ठाकरे यांच्या मनसेशी युती झाली तर मराठी मते एकगठ्ठा ठाकरेंच्या झोळीत पडतील. जर उद्धव आणि राज ठाकरे बीएमसी निवडणुकीसाठी एकत्र आले, तर समीकरणे बदलू शकतात आणि मराठी मतांच्या जोरावर उद्धव यांचा पक्ष पुन्हा एकदा सत्तेत परत येऊ शकतो.
मागील बीएमसी निवडणुकीत अविभाजित शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या. भाजपने 82जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेपेक्षा भाजपच्या जागा फक्त 2 ने कमी होत्या. त्यावेळी, भाजपने ठरवले असते तर अपक्ष आणि इतर नगरसेवकांच्या मदतीने आपला महापौर मुंबई महापालिकेत सहजपणे बसवला असता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी 2019 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेसोबोतचे संबंध खराब करायचे नाहीत हा दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवत महापौरपद शिवसेनेला दिले होते.