Government And Private Offices Holidays: मुंबईमध्ये सलग चौथ्या दिवशी तुफान पाऊस बरसत आहे. हवामान खात्याने आजही मुंबई शहर तसेच उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे महपालिकेने सरकारी तसेच खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
महापालिकेकडून परिपत्रक जाहीर:
भारतीय हवामान खात्याने आज मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे.
या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून आज सुटी जाहीर करण्यात येत आहे.
तसेच, मुंबई महानगरातील सर्व खासगी कार्यालये, आस्थापना यांनी आपल्या कामकाजाच्या स्वरूपानुसार, कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना तातडीने द्याव्यात, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.