Mumbai Kabutar Khana News: कबुतरांना दाणे टाकताना हटकल्याचा राग, वृद्धासह लेकीला बेदम मारहाण, गळा दाबला अन् रॉडने...

मीरारोडजवळील ठाकूर मॉलनजीक असलेल्या डीबी ओझोन इमारतीमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनील महाडेश्वर, मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबूतरखान्यावर (Kabutar Khana) कारवाई करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेकडून शहरातील कबुतरखाने हटवले जात आहेत तसेच सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य घालण्यावरही बंदी करण्यात आली आहे. अशातच आता कबुतराला दाणे टाकण्यास मज्जाव केल्याने एका वृद्ध व्यक्तीसह त्याच्या मुलीला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मीरारोडजवळील ठाकूर मॉलनजीक असलेल्या डीबी ओझोन इमारतीमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, कबुतरांना दाणे टाकू नका असे सांगितले म्हणून वृद्धास मारहाण केल्याचा व मुलीचा गळा दाबून लोखंडी रॉडने मारल्याचा धक्कादायक प्रकार मीरारोडमध्ये घडला आहे. महेंद्र पटेल (वय, 69) असं मारहाण झालेल्या वृद्धाचे आणि  प्रेमल ( वय 46 ) असं मुलीचे नाव आहे. मीरारोडच्या ठाकूर मॉल जवळील डीबी ओझोन इमारतीत हा धक्कादायक प्रकार घडला. 

Mumbai News: कबुतरांसाठी जैन समाज एकवटला! मनसेचा मात्र कडाडून विरोध, मंगलप्रभात लोढांना प्रत्यूत्तर

 डीबी ओझोन इमारत ३० मध्ये राहणार महेंद्र पटेल हे रविवारी त्यांच्या इमारतीच्या खाली दूध आणण्याकरता गेले होते. यावेळी शेजारील 29 नंबरच्या इमारतीत राहणारे अशा व्यास (वय 56) ह्या इमारतीच्या सार्वजनिक परिसरात कबुतरांना दाणे टाकत होत्या. ते पाहून पटेल यांनी त्यांना कबुतरांना दाणे टाकू नका असे म्हटले. यावरुनच व्यास यांनी त्यांना शिवीगाळ सुरु केली. हा सर्व गोंधळ ऐकून पटेल यांच्या मुलगी प्रेमल ( वय ४६ ) ह्या खाली आल्या. वडिलांना शिवीगाळ का करता? अशी विचारणा त्यांनी केली असता व्यास हिने प्रेमल यांना पण शिवीगाळ सुरु केली. 

याठिकाणी व्यास यांच्या इमारतीत राहणारा सोमेश अग्निहोत्री हा दोन अनोळखी लोकांसह आला व त्याने प्रेमलला लोखंडी रॉडने मारले तसेच एकाने त्यांचा गळा दाबला व हाताने मारहाण केली. या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी आशा व्यास, सोमेश अग्निहोत्री व अन्य दोन अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.

VIDEO: 'थार'चा थरार! गाडीला बांधून ATM फोडण्याचा प्रयत्न, चोरट्यांचा प्रताप CCTVत कैद