मुंबई: काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. या हत्या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. एकीकडे धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद देण्यात येऊ नये, अशी मागणी केली जात असतानाच आज धनंजय मुंडे हे अजित पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच त्यांच्या पालकमंत्रीपदालाही विरोध होत आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनामा मागणी वारंवार सगळे पक्षाकडून केली जात आहे .यावरूनच आता अजित पवार यांना ही टार्गेट केले जात आहे याच दरम्यान अजित पवार आणि धनंजय मुंडेंची भेट होण्याची शक्यता आहे. अजित पवार आज शासकीय कामकाज झाल्यानंतर मुंडेना भेटण्याची शक्यता आहे. आता या भेटीत काय चर्चा होती? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, काल पुण्यामध्ये झालेल्या जनआक्रोश मोर्चामध्येही सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाची सुरूवात एप्रिल मे महिन्यात झाली होती. 14 जुनला परळीत धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी जोशी या त्यांच्या पीए बरोबर संवाद केला. आपल्याला डावलून थेट धनंजय मुंडे यांना संपर्क केल्यामुळे वाल्मिक कराडची सटकली अशी माहिती सुरेश धस यांनी यावेळी दिली.