Masina Hospital Mumbai News: रुग्णालयांमध्ये रुग्णांची होणारी हेळसांड, उपचारात हलगर्जीपणा आणि उपचाराच्या नावाखाली होणारी आर्थिक लुटमार आता नित्याचीच झाली आहे. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईतील मसिना या धर्मादाय नोंदणीकृत रुग्णालयात घडली आहे. या रुग्णालयात एका महिला पत्रकाराच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर पैशाअभावी रुग्णालय प्रशासनाने मृतदेह अडवून ठेवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
रुग्णालय प्रशासनाची असंवेदनशीलता
आर्थिक नफा कमावण्याच्या नादात रुग्णालये कशी संवेदनाहीन होत चालली आहेत, याचा प्रत्यय मुंबईतील प्रतिष्ठित मसिना हॉस्पिटलमध्ये आला आहे. एका महिला पत्रकाराच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर केवळ थकीत बिलामुळे तब्बल आठ तास मृतदेह अडवून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे आरोग्य वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत असून, राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आणि कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
महेश भालेराव यांना ८ जानेवारी रोजी या धर्मादाय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान १० जानेवारी रोजी पहाटे ३.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पितृशोक झालेल्या महिला पत्रकाराने मृतदेह ताब्यात घेण्यासाठी विनंती केली असता, रुग्णालय प्रशासनाने नियमांचे कारण पुढे करत मृतदेह देण्यास नकार दिला. रुग्णालयातील ट्रस्टी कविता पै यांची भेट घेण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरला. यापूर्वी ९ जानेवारीला शस्त्रक्रियेसाठी तातडीने ३ लाख रुपये भरण्याची सक्तीही करण्यात आली होती.
आरोग्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील हलगर्जीपणाची घटना ताजी असतानाच, मुंबईत घडलेल्या या प्रकाराने धर्मादाय रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संबधित महिलेने मुख्यमंत्री कार्यालय आणि धर्मादाय आयुक्तांकडे लेखी तक्रार केली असून, आरोग्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता मसिना रुग्णालय प्रशासनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.