विशाल पुजारी, मुंबई: मुंबईतील म्हाडा मुख्यालयात शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. एका संतप्त महिलेने अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये पैसे उधळत जोरदार घोषणाबाजी केली. सुरक्षारक्षकांनी तातडीने क्रिया करत तिला बाहेर काढले, मात्र या प्रकारामुळे संपूर्ण म्हाडा मुख्यालयात चर्चा रंगली आहे. महिलेला इतका संताप का आला ? हा प्रकार भ्रष्टाचाराशी संबंधित आहे का? या घटनेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वांद्रे येथील म्हाडा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मुंबई इमारत सुधारणा आणि पुनर्बांधणी मंडळाच्या सहमुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हर्षा लाड नावच्या महिलेने एक अनोखा निषेध केल. तिच्या काही मागण्यांसाठी, या महिलेने तिच्या गळ्यात 50 रुपयांच्या नोटांचा हार घातला आणि अधिकाऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी केली.
या महिलेने उमेश वाघ नावाच्या अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत हा गोंधळ घातला. उमेश वाघ याच्याकडून गरिबांची लूट होत असून घरांसाठी पैशांची मागणी होत आहे. गेल्या 20 वर्षांपासून गरिबांना घरं दिली नाहीत, असे म्हणत महिलेने संताप व्यक्त केला. या प्रकरणाची म्हाडा कार्यालय परिसरात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
एवढेच नाही तर या महिलेने 6650 रुपये फेकून दिले, त्या सर्व 50 रुपयांच्या नोटा होत्या तसेच लाड यांनी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचाही प्रयत्न केला, परंतु सुरक्षा रक्षकांनी त्यांना वेळीच रोखले आणि म्हाडाच्या इमारतीतून बाहेर काढले, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, खेरवाडी पोलिसांनी पैशाच्या नोटा जप्त करून या महिलेविरुद्ध तक्रार नोंदवण्याची कारवाई केली आहे.
(नक्की वाचा- Amravati News: 'भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण..', कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हिणवलं)