ऋतिक गणकवार, मुंबई:
Mumbai Siddhivinayak Temple Closed: मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील मुख्य मूर्तीला 'सिंदूर लेपन' करण्यात येणार आहे. यामुळे येत्या ७ जानेवारी ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत भाविकांना श्रींच्या मुख्य मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सिद्धिविनायक मंदिर 5 दिवस बंद
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंदिराच्या परंपरेनुसार, ठराविक काळानंतर श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्याची प्रक्रिया पार पडते. बुधवारी (७ जानेवारी) या विधीला सुरुवात होणार असून रविवारी (११ जानेवारी) तो पूर्ण होईल. या पाच दिवसांच्या काळात मुख्य मूर्ती सिंदूर लेपनासाठी झाकलेली असल्याने गाभाऱ्यातून दर्शन बंद राहील.
HSRP नंबर प्लेटची मुदत संपली; आता होणार थेट कारवाई, किती दंड बसू शकतो?
मात्र, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी न्यासाने पर्यायी व्यवस्था केली आहे. या काळात भाविकांना श्रींच्या 'प्रतिमूर्तीचे' दर्शन घेता येणार आहे.
सिंदूर लेपनाचा विधी पूर्ण झाल्यानंतर, सोमवार १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी श्रींच्या मूर्तीचा प्रोक्षणविधी, नैवेद्य आणि आरती पार पडेल. त्यानंतर दुपारी ठीक १.०० वाजल्यापासून भाविकांना नेहमीप्रमाणे गाभाऱ्यातून श्रींचे दर्शन घेता येईल. भाविकांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी केले आहे.
नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)