Mumbai Rain Update: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसाठी हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
(ट्रेंडिंग न्यूज: आनंदाची बातमी! या महिन्यांमध्ये महाराष्ट्रात पाऊस जोरदार बरसणार)
9 जून रोजी मान्सून मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर पावसाने मोठी विश्रांती घेतली. यानंतर बुधवारी (19 जून) पहाटेपासूनच मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये 19 जूनपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाजही भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला होता. हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, 21 जूनपासून मुसळधार पावसाला सुरुवात होईल आणि 30 जूनपर्यंत पावसाची परिस्थिती कायम राहील.
(ट्रेंडिंग न्यूज: मुंबईकरांना पावसासाठी किती दिवस करावी लागणार प्रतीक्षा? हवामान विभागाकडून अलर्ट)
दरम्यान 1 जून रोजी मान्सूनचा कालावधी सुरू झाल्यापासून भारतात 20 टक्के कमी पाऊस पडला आहे. 12 ते 18 जूनदरम्यान पाऊस पडण्याच्या परिस्थिती कोणतीही लक्षणीय प्रगती झाली नाही, असे भारतीय हवामान खात्याने (IMD) म्हटले आहे. दुसरीकडे पुढील तीन ते चार दिवसांत महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश, वायव्य बंगालचा उपसागर, बिहार आणि झारखंड परिसरात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 1 जून ते 18 जूनदरम्यान भारतात 64.5 मिमी पाऊस पडला आहे, जो सरासरीपेक्षा 20 टक्के कमी आहे.
1 जूनपासून कुठे किती प्रमाणात पडला पाऊस?
- वायव्य भारतात 10.2 मिमी पावसाची नोंद (सामान्यपेक्षा 70 टक्के कमी)
- मध्य भारतात 50.5 मिमी पावसाची नोंद (सामान्यपेक्षा 31 टक्के कमी)
- दक्षिण द्वीपकल्पात 106.6 मिमी पावसाची नोंद (सामान्यपेक्षा 16 टक्के जास्त)
- पूर्वेकडील भागामध्ये 10.2 मिमी पावसाची नोंद
- ईशान्य भारत 146.7 मिमी पावसाची नोंद (सामान्यपेक्षा 15 टक्के कमी)