Nagpur News : विदर्भातील 3 जिल्ह्यांत रेड तर 3 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट; उद्या तुमच्या शहरातील शाळा सुरु की बंद?

Vidarbha Heavy Rain: बुधवार 29 जुलै रोजी संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
Nagpur News : नागपुरात दुपारी 2:30 वाजेपर्यंतच 108 मिमी पाऊस कोसळल्यामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे.
नागपूर:

Nagpur Heavy Rain: नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरसदृश परिस्थिती आणि हवामान खात्याने दिलेला ऑरेंज अलर्ट लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना उद्या, बुधवार 29 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत.

'या' जिल्ह्यात  रेड अलर्ट

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, बुधवार 29 जुलै रोजी संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या 3 जिल्ह्यांना  रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे या भागांतील नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Advertisement

नागपूर, वर्धा अन् भंडाऱ्यात ऑरेंज अलर्ट

पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा आणि भंडारा या 3 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ढगांच्या गडगडाटासह येणाऱ्या या पावसामुळे सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.

( नक्की वाचा : Nagpur News :नागपुरात शाळेत पाणीच पाणी, 800 चिमुकले पाण्यात अडकले; पालकांनी जीवाची बाजी लावून वाचवले, VIDEO )

नागपुरात 108 मिमी पाऊस

नागपुरात दुपारी 2:30 वाजेपर्यंतच 108 मिमी पाऊस कोसळल्यामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. हवामान खात्याने 28 ते 30 जुलै दरम्यान जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुसळधार पाऊस असाच सुरू राहिल्यास जिल्ह्यातील सखल भागांत अचानक पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा तातडीचा आदेश

अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये आणि कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी नागपूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करत हा निर्णय घेतला आहे. 

या आदेशानुसार, 29 जुलै 2026 रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्व सरकारी व खासगी अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालये पूर्णपणे बंद राहतील. प्रशासनाने नागरिकांना आणि पालकांना घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

दरम्यान नागपूरसह चंद्रपूर जिल्ह्यातही रेड अलर्टमुळे शाळा, कॉलेज आणि क्लासेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतलाय. अनावश्यक पाऊस टाळा असं आवाहान जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.