Navi Mumbai News: नवी मुंबई महापालिकेचा ढिसाळ कारभार! पंप हाऊस बंद पडल्याने नागरिकांचे हाल

नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महत्त्वाचं म्हणजे या पंपाचे उद्घाटन वर्षभरापूर्वीच करण्यात आले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

नवी मुंबई: तब्बल 5500 कोटींचे बजेट असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेचा नियोजनशून्य कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. नवी मुंबईच्या बेलापूर सेक्टर 15 मध्ये पंप हाऊस बंद असल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महत्त्वाचं म्हणजे या पंपाचे उद्घाटन वर्षभरापूर्वीच करण्यात आले होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बेलापूर सेक्टर 15 मध्ये अवकाळी मुसळधार पावसामुळे प्रचंड पाणी साचले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ५५०० कोटी रुपयांच्या बजेटवर चालणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Advertisement

26 मे रोजी झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागात साचलेले पाणी आणि वाहतुकीचा खोळंबा यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः बेलापूर सेक्टर 15 परिसरात पाणी साठण्याचे मुख्य कारण तेथील पंप हाऊस बंद पडणे हे ठरले. हेच पंप हाऊस एक वर्षांपूर्वी स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते उद्घापित करण्यात आले होते. मात्र 22 कोटी रुपये खर्चाचे हे पंप हाऊस अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेले नाही. कॉन्ट्रॅक्टचे काम अजूनही अपूर्ण असून नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.

नक्की वाचा - Chhatrapati Sambhajinagar : प्रेमाची शिक्षा केवळ दु:ख अन् छळ; माहेरून पैसे आण म्हणत विवाहितेला दोरीने बांधून शरीरावर चटके

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे. “पावसाळा सुरू होण्याआधीच जर अशी परिस्थिती असेल, तर पुढील तीन महिने आम्हाला अजून काय सहन करावं लागेल?” असा सवाल अनेक रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, नवी मुंबई शहरात इतक्या मोठ्या बजेट असूनही मूलभूत सुविधा वेळेवर पूर्ण न होणं, हे महापालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. पंप हाऊसच्या ठिकाणी अद्याप यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत न झाल्याने जलनिकासी ठप्प झाली असून याचे परिणाम संपूर्ण परिसरावर होत आहेत.महापालिका किंवा संबंधित कंत्राटदारांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आली नाही.