Sunil Tatkare Warns Shashikant Shinde : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील राजकारण आता एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एका साप्ताहिकात लिहिलेल्या लेखामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या लेखात त्यांनी अजित दादांना अदृश्य शक्तींनी धमकावल्याचा आणि ते पुन्हा विलीनीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा केला होता. शिंदे यांच्या या दाव्यांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी शशिकांत शिंदे यांना थेट इशारा दिला आहे.
तटकरे यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेमुळे दोन्ही गटांतील वादाची ठिणगी पुन्हा एकदा पडल्याचे चित्र दिसत आहे. शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेले मुद्दे तटकरे यांनी खोडून काढले आहेत. अशा प्रकारचे धादांत खोटे दावे करू नयेत, अन्यथा आम्ही योग्य आणि समर्पक उत्तर देऊ, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले तटकरे?
शशिकांत शिंदे यांनी आपल्या लेखात म्हटले होते की, अजित पवार हे मागील 4 ते 5 महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत होते आणि 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाचा निर्णयही झाला होता. यावर भाष्य करताना सुनील तटकरे म्हणाले की, विलीनीकरणाबाबत जर समोरून अधिकृत प्रस्ताव आला, तरच त्यावर चर्चा होऊ शकते.
मात्र, शशिकांत शिंदे यांनी ज्या पद्धतीने हा विषय मांडला आहे, त्यामागचा नेमका हेतू काय आहे, हे समजू शकलेले नाही. शिंदे यांचे हे लेखन अनाठायी आणि पूर्णपणे गैर असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
( नक्की वाचा : Ajit Pawar Death: 'विठ्ठलाशी आयुष्यभर भांडण राहील'; अमोल मिटकरींचे अजित पवारांसाठी काळीज पिळवटून टाकणारं पत्र )
अजित पवारांनी आपली कोणतीही इच्छा कधीही लपवून ठेवली नव्हती, त्यांनी सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या होत्या. त्यामुळे शिंदे यांनी मांडलेले तर्क चुकीचे आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
'तो' आरोप फेटाळला
शशिकांत शिंदे यांनी आपल्या लेखात अजित दादांना बाहेर पडण्यासाठी अदृश्य हात आणि धमक्या कारणीभूत होत्या, असा उल्लेख केला आहे. या शब्दांवर सुनील तटकरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.
तटकरे म्हणाले की, दादांनी स्वतःच्या निर्णयाने पाऊल उचलले होते, त्यावर कोणाचाही दबाव नव्हता. एनडीए मध्ये सामील होताना मुख्य पक्ष असलेल्या भाजपला विश्वासात घेऊनच आम्ही निर्णय घेतला होता. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस हा एनडीएचा एक भक्कम घटक पक्ष आहे आणि भविष्यातही तो एनडीएचाच भाग राहील, असा पुनरुच्चार तटकरे यांनी केला.
शिंदे यांनी ज्या पद्धतीने अजित दादांच्या निधनानंतर हा लेख लिहिला आहे, त्यावरून तटकरे यांनी आश्चर्य व्यक्त केले. जबाबदार जुने सहकारी अशा प्रकारचे वक्तव्य का करत आहेत, हे अनाकलनीय असल्याचे ते म्हणाले.
( नक्की वाचा : Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघाती निधनाबद्दल 5 मोठे प्रश्न, रोहित पवारांनी मागितली उत्तरं )
शशिकांत शिंदे यांच्या लेखातील खळबळजनक मुद्दे
शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकात लिहिलेल्या लेखात अनेक खळबळजनक खुलासे केले होते. त्यांच्या मते, अजित दादांवर खोट्या आरोपांचे षडयंत्र रचले गेल्यामुळे त्यांना बाहेर पडावे लागले होते. मात्र, झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी दादा गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या संपर्कात होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण करून पक्षाची संपूर्ण धुरा अजित दादांकडे सोपवण्याचा निर्णय साहेबांच्या उपस्थितीत झाला होता, असा दावा शिंदे यांनी केला आहे.
या दोन्ही पक्षांना एकत्र आणणे हीच अजित दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहनही शिंदे यांनी आपल्या लेखातून कार्यकर्त्यांना केले होते. मात्र, या भावनिक आवाहनाला तटकरे यांनी राजकीय वास्तवाची जोड देत विरोध दर्शवला आहे. आता या वादामुळे दोन्ही गटांतील धुसफूस आगामी काळात अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.