दसरा आणि दिवाळीसारख्या मोठ्या सणांमुळे ऑक्टोबर 2025 मध्ये ग्राहकांना त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या बँक सुट्ट्यांच्या वेळापत्रकानुसार, ऑक्टोबर महिन्यातील एकूण 31 दिवसांपैकी बँकांमध्ये 11 दिवस कामकाज होणार नाही. या सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांसह राष्ट्रीय आणि प्रादेशिक सणांच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या सुट्ट्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास राज्यात एकूण 9 दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआयच्या नियमांनुसार, प्रत्येक महिन्यातील सर्व रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार बँकांना साप्ताहिक सुट्टी असते.
नक्की वाचा: 'सन्नी संस्कारी की तुलसी कुमारी' वर 'कांतारा' भारी पडणार ? ॲडव्हान्स बुकींगचे आकडे आले
ऑक्टोबर महिन्यातील बँक हॉलीडेची संपूर्ण यादी
क्र. | तारीख | सुट्टीचा प्रकार | सुट्टीचे कारण |
1 | 2 Oct | राष्ट्रीय/सण | दसरा (विजयादशमी)/ महात्मा गांधी जयंती |
2 | 5 Oct | साप्ताहिक | रविवारची सुट्टी |
3 | 11 Oct | साप्ताहिक | दुसरा शनिवार |
4 | 12 Oct | साप्ताहिक | रविवारची सुट्टी |
5 | 19 Oct | साप्ताहिक | रविवारची सुट्टी |
6 | 21 Oct | सण | लक्ष्मी पूजन |
7 | 22 Oct | सण | बळी प्रतिपदा |
8 | 25 Oct | साप्ताहिक | चौथा शनिवार |
9 | 26 Oct | साप्ताहिक | रविवारची सुट्टी |
वर नमूद केलेल्या तारखांना बँकेच्या शाखांमधील सगळे व्यवहार बंद असतील. बँक चेक क्लिअरन्स, पासबुक अपडेट आणि रोख रक्कम काढणे यासारख्या सेवा वरील दिवशी उपलब्ध नसतील. याव्यतिरिक्त, प्रत्येक राज्याच्या स्थानिक सणानुसार (उदा. छठ पूजा किंवा इतर प्रादेशिक उत्सव) आणखी काही सुट्ट्या लागू होऊ शकतात, ज्या आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या संपूर्ण यादीत समाविष्ट आहेत.
नक्की वाचा: या चित्रात तुम्हाला कोणता प्राणी दिसला? उत्तरात दडलाय तुमचा स्वभाव
डिजिटल मार्गाने करू शकता व्यवहार
सणाच्या दिवसांत होणारी गैरसोय टाळण्यासाठी, डिजिटल बँकिंग चॅनेल्सचा वापर करता येईल. मोबाईल ॲप, नेट बँकिंग आणि एटीएम यासारख्या सुविधा 24x7 कार्यरत राहतील. जर तुमची कोणतीही महत्त्वाची आर्थिक डेडलाईन, जसे की कर्ज हप्ता किंवा आरडीची रक्कम सुट्टीच्या दिवशी येत असेल, तर त्याची प्रक्रिया आरबीआयच्या नियमांनुसार पुढील कामाच्या दिवशी पूर्ण केली जाईल. याव्यतिरिक्त अन्य काही महत्त्वाचे काम असेल ज्यासाठी बँकेत जाणे गरजेचे आहे, तर त्यासाठी तुम्ही सुट्ट्या पाहून नियोजन करू शकता.