योगेश लाटकर, प्रतिनिधी
Operation Tiger: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एका अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमीने पुन्हा एकदा संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून काढले आहे. राज्याच्या राजकारणात 'गुवाहाटी पॅटर्न'ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झालीय. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या न 'ऑपरेशन टायगर'च्या घडामोडींना अचानक प्रचंड वेग आला आहे. ठाकरे गटाचे 3 खासदार अचानक 'नॉटरिचेबल' झाल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडालीय. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात पुन्हा एकदा उभी फूट पडणार असल्याची चर्चा जोरात आहे.
विशेष विमानाने खासदार दिल्लीला रवाना
या संपूर्ण ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर परभणीचे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख हे दोघेही एका विशेष विमानाने तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांची स्वाक्षरी घेऊन संजय जाधव दिल्लीला गेले आहेत.
संसदेत स्वतंत्र गट नोंदणी करण्याआधी पक्षांतर बंदी कायद्यातून वाचण्यासाठी खासदारांचा एक मोठा गट एकत्र करून त्यांना पुन्हा एकदा अज्ञातस्थळी ठेवण्याची पूर्वतयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे.
( नक्की वाचा : आधी फडणवीसांना नडले, आता ठाकरे सरकारचे वाभाडे काढले! 'या' वकिलाच्या दाव्याने राज्याचे राजकारण पुन्हा तापणार )
जून महिन्यातील मोठी राजकीय उलथापालथ
सूत्रांकडून मिळालेल्या अतिशय महत्त्वाच्या माहितीनुसार, येत्या 21 जून रोजी मराठवाड्यातील आणखी एक मोठा खासदार अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश करणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या 'ऑपरेशन टायगर'चा हा अखेरचा टप्पा असल्याचे सांगण्यात येत आहे.
जून महिन्याच्या अखेरीस ठाकरेंचे अनेक खासदार सोबत सोडून जातील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सातत्याने सुरू होती, त्याला आता या घडामोडींमुळे थेट बळ मिळाले आहे.
'मातोश्री'वरील अनुपस्थितीमुळे संशयाची पाल चुकचुकली
दोन दिवसांपूर्वी मुंबईत 'मातोश्री'वर ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची आणि खासदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली होती. मात्र, या बैठकीला अनेक बडे खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले नव्हते. खासदारांच्या या अनुपस्थितीमुळेच ठाकरेंच्या गोटात काहीतरी मोठे शिजत असल्याचा संशय बळावला होता. खासदारांच्या मनात सुरू असलेली हीच धुसफूस आता थेट बंडाच्या पवित्र्यापर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे.
संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे संभाव्य फुटीवर शिक्कामोर्तब?
या सर्व घडामोडींमागे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेले एक सोशल मीडियावरील ट्वीट सध्या प्रचंड चर्चेत आले आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांचा संदर्भ देत त्रिपुरातील 'शिऊ कुंडू' यांच्या राष्ट्रवादी नागरिक पक्षाचा दाखला दिला आहे. त्रिपुरात ज्याप्रमाणे तृणमूलच्या 22 खासदारांनी एका लहान पक्षात स्वतःला विलीन करून घेतले, तसेच काहीसे महाराष्ट्रातील फुटीरांनाही करावे लागेल, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
संविधानातील 10 व्या अनुच्छेदाचा हवाला देत राऊतांनी ही टीका केली असली, तरी त्यांच्या या ट्वीटमुळे महाराष्ट्रात खासदारांची मोठी फूट पडणार असल्याच्या शक्यतेवर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले असं मानलं जात आहे.