विशाल पुजारी
काही ग्रामपंचायती या आपल्या कामाने आणि निर्णयाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत असतात. त्यांची निर्णय क्षमता असेल किंवा गावासाठी वेगवेगळ्या योजना असतील त्याची दखल राज्य सरकारही काही वेळा घेत असतं. अशाचाच एक भाग म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आणि अनोखा असा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव या ग्रामपंचायतीने घेतला आहे. या गावाने आई-वडिलांची काळजी घेण्याविषयीची एक योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घेणारी आहे. आमचे आई-वडील आमची जबाबदारी असं या योजनेचं नाव आहे.
माणगाव ग्रामपंचायतीची एक विशेष ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला. हा विषय होता निराधार ज्येष्ठ नागरिकांचा. ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांबाबतच्या चर्चा या ग्रामसभेत झाल्या. या चर्चेतूनच ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय झाला. या निर्णयातूनच एक नाविन्यपूर्ण अशी योजना जाहीर करण्यात आली. ही योजना आहे ज्येष्ठ नागरिकांना औषध उपलब्ध करून देण्याविषयी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून ही योजना लागू करण्यात येणार असल्याचे ग्रामसभेतून सांगण्यात आलं.
माणगाव ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत ही योजना मांडण्यात आली. "आमचे आई-वडील आमची जबाबदारी" या नावाने एक नावीन्यपूर्ण योजना जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत गावातील 65 वर्षांवरील निराधार ज्येष्ठ नागरिकांना ब्लड प्रेशर व शुगरची औषधे प्रतिमाहिना आयुष्यभर मोफत देण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती सरपंच डॉ. राजू मगदूम यांनी दिली आहे.या योजनेचा खर्च ग्रामनिधीतून केला जाणार आहे.
सर्व पात्र नागरिकांचा सर्वेक्षणानंतर लाभ दिला जाणार आहे. गावातील जवळपास 100 ते 125 ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होईल. देशातील अशा प्रकारची योजना राबवणारी माणगाव ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. सरपंच डॉ. राजू मगदूम यांनी या उपक्रमामुळे जेष्ठांच्या आरोग्याला मोठा हातभार लागेल असा विश्वास व्यक्त केला आहे. माणगाव ग्रामपंचायत मार्फत लागू करण्यात आलेल्या या योजनेची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबवले गेले. काही ठिकाणी पर्यावरणाचा संदेश देणारे उपक्रम देखील राबवल्याचे पाहायला मिळालं. मात्र माणगाव ग्रामपंचायतने जाहीर केलेली योजना सध्या चर्चेत आहे.