स्वानंद पाटील, प्रतिनिधी
Pankaja Munde Audio Viral Clip बीड येथील शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या जालना रोडवरील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी ही तोडफोड केल्याची माहिती आहे. आज (गुरुवार, 27 जून) जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये त्यांनी पंकजा मुंडे यांना पहिल्यांदाच धोका दिला असं म्हंटलं होतं. त्याचे पडसाद आता उमटत आहेत. या तोडफोडीची माहिती मिळताच बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे ऑडिओ क्लिप?
बीडमधील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची ही ऑडिओ क्लिप आहे, असं सांगितलं जात आहे. यामध्ये खांडे स्वत: पंकजा मुंडे यांना धोका दिल्याची कबुली देत आहेत. आपण पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांना असा धोका दिला आहे, असं खांडे या क्लिपमध्ये सांगत आहेत.
त्याचबरोबर धनंजय मुंडे बीडमध्ये येताच त्यांच्या वाहनावर मी हल्ला करतो असंही त्यांनी या कथित ऑडिओ क्लिपमध्ये म्हंटल्याचं दिसत आहे. निवडणूक निकालापूर्वी झालेल्या या कथित संभाषणाची या ऑडिओ क्लिप आता वायरल झाली असून याची जोरदार चर्चा बीडमध्ये सुरु होती. त्यानंतर खांडे यांच्या कार्यलायाची तोडफोड झाली आहे.
( नक्की वाचा : 'वडीगोदरीमध्ये पाहा, वाह रे वाह', पंकजा मुंडे यांचा इशारा कुणाकडं? )
दरम्यान, या व्हायरल क्लिपवर भाजपाकडूनही प्रतिक्रिया आली आहे.'महायुतीचे घटक पक्ष म्हणून आम्ही सर्वजण सोबत काम करत होतो. आता जी क्लिप व्हायरल होत आहे त्यामध्ये एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याने विरोधी उमेदवाराचे काम केल्याची कबुली दिली आहे या क्लिपची सत्यता तपासून आम्ही वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत,' असं भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी म्हंटलं आहे.