Pimpri-Chinchwad Election: PCMC च्या अंतिम प्रभाग रचनेला आयोगाची मान्यता, वाचा 3 महत्त्वाचे बदल

Pimpri-Chinchwad Election: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आज (6 ऑक्टोबर) पार पडला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पिंपरी चिंचवड:

सूरज कसबे, प्रतिनिधी 

Pimpri-Chinchwad Election: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आज (6 ऑक्टोबर) पार पडला आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला अधिकृतपणे मान्यता दिली आहे. यामुळे आता पीसीएमसी निवडणुकीचे वेध लागले आहेत.

ही आगामी निवडणूक 2017 च्या प्रभाग रचनेनुसार होणार आहे. त्यानुसार शहरात एकूण 32 प्रभाग आणि 128 नगरसेवक संख्या कायम राहणार आहे.

काय झाले बदल?

महापालिकेने 22 ऑगस्ट रोजी चारसदस्यीय पद्धतीने या 32 प्रभागांची प्रारूप रचना प्रसिद्ध केली होती. या प्रारूप रचनेवर मोठ्या प्रमाणात हरकती व सूचना आल्या होत्या, ज्यावर 10 सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी शिफारशी विचारात घेऊन प्रभाग रचना अंतिम केली आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ती 15 सप्टेंबर रोजी नगर विकास विभागाला सादर केली होती.

आयोगाने मान्य केलेल्या अंतिम रचनेत काही महत्त्वाचे बदल समाविष्ट आहेत:

2 हरकती-सूचना पूर्णतः मान्य करण्यात आल्या आहेत. 3 हरकती-सूचना अंशतः मान्य करण्यात आल्या आहेत. इतर सर्व हरकती-सूचना अमान्य करण्यात आल्या आहेत.

ज्या हरकती-सूचना मान्य करण्यात आल्या, त्यापैकी तीन (3) प्रभागांच्या व्याप्ती आणि वर्णनांमध्ये बदल करण्यात आला आहे. हे बदल खालीलप्रमाणे आहेत

प्रभाग क्रमांक 10 मध्ये अण्णासाहेब मगर नगर, टिपू सुलतान नगर, बी.एस.एन.एल. परिसर, एम.आय.डी.सी. ऑफीस चिंचवड हा भाग प्रभागात समाविष्ट होताच, परंतु 'व्याप्ती' मध्ये नावाचा उल्लेख नव्हता, तो आता अंतिम रचनेत समाविष्ट करण्यात आला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Bihar Election: पोलिंग बूथवर फक्त 1200 मतदार; मोबाईल नेता येणार, बिहार निवडणुकीत पहिल्यांदाच 10 ऐतिहासिक बदल )
 

प्रभाग क्रमांक 11 मध्ये भिमशक्तीनगरमध्ये हा भाग प्रभागात समाविष्ट होताच, परंतु 'व्याप्ती' मध्ये नावाचा उल्लेख नव्हता, तो आता अंतिम रचनेत समाविष्ट करण्यात आला.

प्रभाग क्रमांक 26 मध्ये वाकड हा भाग प्रभागात समाविष्ट होताच, परंतु 'व्याप्ती' मध्ये नावाचा उल्लेख नव्हता, तो आता अंतिम रचनेत समाविष्ट करण्यात आला.

Advertisement

अंतिम प्रभाग रचना कधी?


राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिलेली ही अंतिम प्रभाग रचना आता लवकरच शासन राजपत्रामध्ये, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संकेतस्थळावर, तसेच महापालिका मुख्यालय आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

2017 मधील पक्षीय बलाबल (128 नगरसेवक)

प्रभाग रचनेला मान्यता मिळाल्याने निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. मागील 2017 च्या निवडणुकीत महापालिकेतील पक्षीय बलाबल खालीलप्रमाणे होते:
भारतीय जनता पक्ष (BJP) - 77
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) - 36
शिवसेना (SS) - 9
अपक्ष (Independent) - 5
मनसे (MNS) - 1

Advertisement

(टीप:  5 अपक्ष नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता.)

Topics mentioned in this article