शुभम बायस्कार, अमरावती:
Bachchu Kadu Shivsena Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत ते प्रहारचे नेते बच्चू कडू. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून कडूंना विधानपरिषदेची ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र ही ऑफर सरळ नाही, तर प्रहार जनशक्ती पक्षाचं शिवसेनेत विलिनीकरण करण्याची अट घालण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. पार्श्वभूमीवर उद्या दुपारी 12 वाजता बच्चू कडू पत्रकार परिषद घेणार असून या ऑफरबाबत अंतिम भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंची गोड ऑफर, बच्चू कडू काय निर्णय घेणार?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ॲाफरवर प्रहारच्या अनेक पदाधिकाऱ्यांची सकारात्मक भुमिका घेतली आहे. बच्चू कडू यांना आमदारकी आणि मंत्रीपद दिल्यास शिवसेनेसोबत जा असं प्रहारच्या अनेक पदाधिकाऱ्यांचं मत आहे. तसेच विदर्भातील शिवसेनेची सूत्रं हातात देण्याचीही प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. बच्चू कडू पदाधिकाऱ्यांची मतं लक्षात ठेऊन निर्णय घेणार आहेत.
बच्चू कडू यांच्या या निर्णयाकडे केवळ सत्ताधारीच नाही तर विरोधकांचंही लक्ष लागलं आहे. कडू यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे आमदार रवी राणा यांनीही त्यांना फोन करून चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. यामुळे या राजकीय घडामोडींना आणखी वेगळं वळण मिळालं आहे. प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्येही या निर्णयाबाबत उत्सुकता आहे. “कडू जो निर्णय घेतील, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत…” अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते आहे.
प्रहारचे भवितव्य उद्या ठरणार!
राजकीय विश्लेषकांच्या मते ही केवळ ऑफर नाही, तर बच्चू कडू यांच्या राजकीय पुनर्वसनाची मोठी संधी मानली जाते आहे. एकीकडे सत्तेत प्रवेश, दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न थेट सभागृहात मांडण्याची संधी, मात्र त्यासाठी पक्ष विलिनीकरणाचा मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे ऑफर केवळ राजकीय समीकरण नाही, तर कडू यांच्या पुढील राजकीय प्रवासासाठी निर्णायक टप्पा ठरू शकतो.
या संपूर्ण प्रकरणावर आता सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे “कडूंनी सत्तेत जावं आणि शेतकऱ्यांचा आवाज अधिक प्रभावी करावा” अशी भूमिका, तर दुसरीकडे “प्रहारचं स्वतंत्र अस्तित्व टिकवलं पाहिजे” असा विरोधी सूरही दिसतो आहे. ही“डील आहे की दबाव?” “पुनर्वसन की राजकीय गणित?” अशा वेगवेगळ्या चर्चा आणि तर्कवितर्क राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत.