स्वानंद पाटील, प्रतिनिधी
Suresh Dhas on Prajakta Mali : बीड जिल्ह्यातले भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीवर केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे 24 तासांपूर्वीच धस यांनी या प्रकरणात माफी मागण्यास नकार दिला होता. त्यानंतर धस यांनी यू टर्न घेत त्यांच्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्राजक्ता ताई माळीबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता. त्यांच्या चारित्र्याबाबत इतर बोलण्याचा विषयच नव्हता. मी प्राजक्ता ताईंसह सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने, त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो.
काय होतं प्रकरण?
बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्याकांडावर बोलताना धस यांनी परळी पॅटर्नचा उल्लेख केला होता. त्यामध्ये त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा उल्लेख केला होता. प्राजक्तानं पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त केला होता. तिनं धस यांच्या वक्तव्याची महिला आयोगाकडं तक्रार केली होती. त्याचबरोबर तिनं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती.
( नक्की वाचा : Prajakta Mali : 'परळीत पुरुष कलाकार जात नाहीत का?' सुरेश धस यांच्या आरोपांना अभिनेत्रीचं चोख उत्तर )
प्राजक्ताला या प्रकरणात सर्व बाजूनं पाठिंबा मिळत होता. त्यामुळे अखेर धस यांनी या प्रकरणात दिलगीरी व्यक्त केली आहे.
काय म्हणाली होती प्राजक्ता ?
'ते इव्हेंट मॅनेजमेंटबाबत सांगत होते. पण, यामध्ये महिला कलाकारांचीच नावं का येतात? परळीला कधीच कुणी पुरुष कलाकार कार्यक्रमाला गेला नाही का? त्यांची नावं का येत नाहीत? इव्हेंट मॅनेजमेंटचं तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर पुरुष कलाकारांची नावं घ्या ना...महिलांची नावं घेऊन अतिशय कष्टानं, संघर्षमय आयुष्य जगून महिला मोठ्या होतात, आपलं नाव कमावतात, त्यांची प्रतिमा ते असं बोलून डागळतात,' या शब्दात प्राजक्तानं संताप व्यक्त केला होता. त्याचबरोबर धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती.
( नक्की वाचा : सपना चौधरी, रश्मिका मंदाना आणि प्राजक्ता माळी! सुरेश धस यांनी सांगितला 'आकाचा' परळी पॅटर्न )
धस यांनी दिला होता नकार
प्राजक्ता माळीची मागणी यापूर्वी धस यांनी धुडकावून लावली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुणाची तरी कोंडी झाली आहे. ती फोडण्यासाठी काही क्लुप्त्या केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही पत्रकार परिषद घेतली गेली असा आरोप धस यांनी यापूर्वी केला होता.
प्राजक्ता माळी यांनी मी जे वक्तव्य केलं ते त्यांनी पुन्हा एकदा पहावं असं ते म्हणाले. त्यांचा गैरसमज त्यांनी दूर करून घ्यावा. त्यांना राजकारणात खेचण्याचा काही एक संबंध नाही. त्यांची आणि माझी ओळखही नाही. मी त्यांना केवळ महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रम पाहत असतो असं धस म्हणाले. त्यांनी माझा आता निषेध केला आहे. तर मी पण त्यांचा निषेध म्हणून महाराष्ट्राची हास्य जत्रा बघायचं बंद करतो असं धस यांनी सांगितलं होतं.