वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकर यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती पक्षाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी आढळल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तीन ते पाच दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतील असंही सांगण्यात आलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आंबेडकरांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. गुरुवारी (31 ऑक्टोबर) पहाटे त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बाळासाहेब यांच्या हृदयात रक्ताची गठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
नक्की वाचा - मुंबईत 472 उमेदवारांचे अर्ज ठरले वैध, अवैध ठरलेल्यांत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा समावेश
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील काही वेळात त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. कुणीही प्रश्न विचारून व्यत्यय आणू नये. कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा, अशी विनंती आंबेडकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे. पुढील ३ ते ५ दिवस प्रकाश आंबेडकर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असतील. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.