रणजी ट्रॉफी 2025-26 हंगामाला (Ranji Trophy 2025-206) सुरुवात व्हायची आहे. यापूर्वीच्या सराव सामन्यात एक घटना घडली आहे, ज्यामुळे पृथ्वी शॉ पुन्हा एकदा वादात सापडला आहे. पुणे येथील एमसीए स्टेडियमवर (MCA Cricket Stadium Pune) महाराष्ट्र आणि मुंबई (Maharashtra Vs Mumbai Cricket Match) या दोन संघांमध्ये सराव सामना सुरू असताना, महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने आपले 181 धावांची तुफानी खेळी केली. मात्र या कामगिरीला त्यानेच गालबोट लावले आहे. मुंबई संघाला रामराम ठोकत पृथ्वी शॉने महाराष्ट्राच्या संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्राच्या संघाकडून खेळत असलेल्या पृथ्वी शॉने आपल्या बॅटने टीकाकारांनी तोंडे बंद करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र त्याच्या उद्दाम वर्तनाने तो पुन्हा वादात सापडलाय. बाद झाल्यानंतर भडकलेल्या पृथ्वी शॉने मुंबईच्या युवा खेळाडू मुशीर खानला बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
नक्की वाचा: आऊट झाल्यानंतर रागाच्या भरात वैभव सूर्यवंशीने काय केलं? अंपायरसोबतच्या वादाचा पाहा Video
पृथ्वीचे द्विशतक हुकले
एकेकाळी भारतीय संघाकडून खेळणाऱ्या आणि भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार असलेल्या पृथ्वी शॉने या सराव सामन्यात चांगली कामगिरी केली. आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या पृथ्वीने 140 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. त्याने सलामीचा फलंदाज अर्शिन कुलकर्णीसोबत मिळून 305 धावांची विक्रमी भागीदारी रचली. एकेकाळी मुंबई संघातून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पृथ्वीला द्विशतक झळकावण्याची संधी होती मात्र 181 धावांवर खेळत असताना मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. भारताचा कसोटीपटू सरफराज खानचा लहान भाऊ मुशीर खानने त्याला बाद केले.
पृथ्वी शॉने उगारली मुशीर खानवर बॅट
शॉ बाद झाल्यानंतर, मुशीर खानने जल्लोष केला. त्याने केलेले सेलिब्रेशन पृथ्वी शॉ याला अजिबात आवडले नाही. पॅव्हेलियनकडे परतत असताना, शॉचा संताप अनावर झाला. त्याने मुशीर खानकडे धाव घेत त्याच्यावर बॅट उगारली. यामुळे मैदानात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबईच्या खेळाडूंनी आणि अंपायर्सनी हस्तक्षेप करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पृथ्वी शॉचा राग अजिबात शांत झाला नव्हता. पॅव्हेलियनकडे परतत असताना पृथ्वी शॉ याची मुंबई संघाचा कर्णधार सिद्धेश लाड याच्याशीही बाचाबाची झाल्याचे कळते आहे.
नक्की वाचा: सामन्यापूर्वीच पाकिस्तानी महिला कॅप्टनने उडवली खळबळ! म्हणाली, आधी जे काही झालंय, ते आम्हाला..
वादग्रस्त प्रतिमा
अत्यंत प्रतिभावान युवा क्रिकेटपटू म्हणून पृथ्वी शॉने लौकीक मिळवला होता. मात्र धावांचे सातत्य राखण्यात आलेले अपयश, संघातून मिळालेला डच्चू, मैदानाबाहेर वादग्रस्त वागणे, वाईट संगत लाभल्याचा झालेला आरोप यामुळे पृथ्वी शॉची प्रतिमा डागाळली होती. मुंबई संघात स्थान मिळणे मुश्कील झाल्यानंतर पृथ्वीने मुंबई संघाऐवजी महाराष्ट्र संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. कारकिर्दीच्या या टप्प्यावर महाराष्ट्र संघात खेळणे, मला एक क्रिकेटपटू म्हणून फायदेशीर ठरेल असे त्याचे म्हणणे होते. पृथ्वीच्या या वर्तनानंतर बीसीसीआय त्याच्यावर कारवाई करण्याची शक्यता असून ती काय असेल याकडे आता क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे.