पुणे शहरातील लाखो नोकरदारांसाठी आणि स्थानिक रहिवाशांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. पुणे शहराचे आयटी हब असलेल्या हिंजवडीच्या दिशेने जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कात्रज-किवळे बाह्यवळण मार्गावर (मुंबई-बेंगलोर महामार्ग) 15 ऑक्टोबर 2025 पासून जड वाहनांना ठराविक वेळेत प्रवेशबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नऱ्हे ते किवळे दरम्यान झालेल्या नागरिकीकरणामुळे आणि औद्योगिकीकरणामुळे या बाह्यवळण मार्गावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. या मार्गाला पर्याय नसल्यामुळे, पुणे आणि मुंबई-बेंगलोर दरम्यान प्रवास करणारी मल्टी अॅक्सल, ट्रेलर्स तसेच कंटेनर्स सारखी मोठी वाहने देखील याच रस्त्याचा वापर करतात. परिणामी, सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि अपघातांचे प्रमाण वाढते.
नक्की वाचा: दिवाळीच्या निमित्ताने भिडे पुलावरून सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीस परवानगी
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते निर्देश
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 'स्लो मुव्हिंग' वाहनांसह (उदा. टॅक्टर, जेसीबी) अवजड वाहनांवर बंदी घालण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी हा महत्त्वाचा नियम लागू केला आहे. हा नियम केवळ शहरातून न जाता थेट दुसऱ्या शहरात जाणारी वाहने थांबवण्यासाठी आहे.
पुण्यात अवजड वाहनांना कुठे आणि कधी असणार बंदी ?
सकाळी
- बंदीचा कालावधी- सकाळी 8 ते 11
- बंदीची दिशा- कात्रजकडून किवळेकडे (पुण्याहून मुंबईकडे जाणारी लेन).
- वाहनांना कुठे अडवणार?- यामुळे हिंजवडीकडे जाणाऱ्या नोकरदारांचा प्रवास सुकर होईल. सातारा, कोल्हापूर बाजूकडून येणारी अवजड वाहने शिंदेवाडी टोलनाक्यावर थांबवली जातील.
संध्याकाळी
- बंदीचा कालावधी संध्याकाळी 5 ते 9
- बंदीची दिशा: किवळेकडून कात्रजच्या दिशेने (मुंबईहून पुण्याकडे येणारी लेन).
- वाहनांना कुठे अडवणार? यामुळे हिंजवडीतून घरी परतणाऱ्या प्रवाशांना कोंडीतून मुक्ती मिळेल. अवजड वाहने उर्सेवाडी टोलनाका किंवा वडगाव फाटा येथे थांबवण्यात येतील.
नक्की वाचा: जिल्हा परिषद आरक्षण सोडतीची तारीख जाहीर, तुमच्या पंचायत समितीची सोडत कुठे होणार ? वाचा संपूर्ण यादी
या बंदीमधून पेट्रोल, डिझेल, दूध, शेतीमाल आणि पुणे शहराच्या अंतर्गत भागात माल घेऊन जाणारी/येणारी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळण्यात आली आहेत. हा निर्णय पुणेकरांच्या सुरक्षित आणि जलद प्रवासासाठी घेण्यात आला आहे.