अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:
Pune Water Cut: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची अन् मोठी बातमी. येत्या गुरुवारी म्हणजे 16 एप्रिल रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. देशभाल दुरुतीच्या कामामुळे शहरात पाण्याचा एक थेंबही मिळणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याचे आणि साठवून ठेवण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
पुणे शहरात पाणीपुरवठा बंद!
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील तांत्रिक सक्षमीकरणासाठी येत्या गुरुवारी, १६ एप्रिल रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या अखत्यारीतील विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत, पंपिंग आणि स्थापत्यविषयक तातडीची देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.
या निर्णयामुळे केवळ मध्यवर्ती शहरच नव्हे, तर महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेली गावे आणि बूस्टर पंपिंग अंतर्गत येणाऱ्या परिसरांनाही या पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र विभागांतर्गत येणाऱ्या पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर पंपिंग स्टेशनवर ही दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.
पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल, तर शुक्रवारी (१७ एप्रिल) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. यंत्रणेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ही कामे अनिवार्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
खबरदार! पाणी वाया घालवाल तर...
दुसरीकडे, पाणी वाया घालणावऱ्या पुणे करांवर आता थेट कारवाई होणार आहे. शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी वाया घालवण्याच्या प्रकारांवर महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाच्या हद्दीत अलीकडेच केलेल्या पाहणीत नागरिकांच्या घरांमधील पाण्याच्या टाक्या ओव्हर फ्लो होत असल्याचे आढळून आले आहे. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे निदर्शनात आले असून संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.