रेवती हिंगवे, पुणे:
Suresh Kalmadi Passed Away: राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय काँग्रेसच नेते, पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून सुरेश कलमाडी यांची तब्येत बिघडली होती,पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात सुरेश कलमाडी यांच्यावरती उपचार सुरु होते. अशातच त्यांची आज प्राणज्योत मालवली.
सुरेश कलमाडी यांचे निधन..
पुण्याच्या राजकारणातील धुरंधर, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे दुःखद निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. आज दुपारी दोन वाजेपर्यंत सुरेश कलमाडी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी ठेवले जाणार आहे. त्यानंतर कलमाडी यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
सुरेश कलमाडी हे काँग्रेसचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जात होते. पुण्यात काँग्रेस रुजवण्याचे काम सुरेश कलमाडी यांनी केले. ते पुणे शहराचे अनेक वर्ष खासदार होते. पुणे शहराला क्रीडानगरी म्हणून ओळख करुन देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.सुरेश कलमाडी यांच्याच नेतृत्वामुळे काँग्रेसला 1992, 1997 आणि 2002मध्ये महानगरपालिकेत यश मिळाले.
राष्ट्रकूल घोटाळ्यामुळे झाली होती अटक
राजकारणासोबतच सुरेश कलमाडी यांचा क्रीडा क्षेत्रातही वावर होता. सुरेश कलमाडी यांनी भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्षपदही भुषवले. त्याचबरोबर दिल्लीमध्ये झालेल्या 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे ते अध्यक्ष होते. 2010 मध्ये राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. इथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. या प्रकरणात सुरेश कलमाडी यांना अटकही झाली होती.