यशपाल सोनकांबळे, पुणे:
Pune Mumbai Train Cancelled: पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि प्रवाशांसाठी शुक्रवारचा (ता. १० जुलै) दिवस अडचणीचा ठरणार आहे. मुंबई- पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यानंतर आठवडाभरापासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अशातच आता रेल्वे प्रशासनाने शुक्रवारीही या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या गाड्या उद्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो प्रवाशांचे हाल होणार असून, ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये प्रवाशांची सर्वाधिक पसंती असलेल्या ‘डेक्कन क्वीन'चा समावेश आहे, ही बाब प्रवाशांची गैरसोय वाढवणारी आहे. याशिवाय पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस या गाड्याही उद्या धावणार नाहीत. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या संबंधित गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत, त्यामुळे दुहेरी वाहतुकीवर परिणाम होणार आहे. यासोबतच लांब पल्ल्याच्या साईनगर-शिर्डी-दादर एक्सप्रेसही उद्याच्या वेळापत्रकातून वगळण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन बदलून रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ॲपवर गाड्यांच्या स्थितीची खातरजमा करून घ्यावी. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि पर्यटकांची मोठी तारांबळ उडणार आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून बससेवेवर प्रवाशांचा ताण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.