सुरज कसबे, पुणे:
Leopard In Aundh Pune Viral Video: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याने दहशत माजवली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यूही झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. गावात आढळणाऱ्या बिबट्याने आता थेट पुण्याच्या वेशीकडे धाव घेतली आहे. शहरातील औंध परिसरात बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये भिती पसरली आहे.
पुण्याच्या वेशीवर बिबट्या...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहराच्या औंध भागातील सिंध सोसायटी परिसरात पहाटेच्या सुमारास बिबट्या दिसल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. हा बिबट्या सोसायटीच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्या आढळून आल्याची ही घटना पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि 'टीम रेस्क्यू'ने त्वरित बिबट्याचा शोध सुरू केला आहे.
Pune Crime: शरद मोहोळ ते आंदेकर.. पुण्याच्या रक्तरंजित गुन्ह्याचे MP कनेक्शन! एक गाव 3 राज्यात धमाके
सतर्कतेचे आवाहन
पहाटे 4 नंतर मात्र बिबट्याच्या कुठल्याही खुणा मिळून न आल्याची माहिती आहे. त्यामुळे, बिबट्याचा शोध घेण्यासाठी आता थर्मल ड्रोनचा वापर केला जात आहे. वन विभाग बिबट्याला लवकर पकडण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रकारानंतर स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, पोलिसांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा तसेच कामाशिवाय बाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर पाळीव प्राण्यांनाही न सोडण्याच्या सूचना दिल्यात. पथके या बिबट्याचा शोध घेत असून गस्त, कॅमेरे, ट्रॅपच्या माध्यमातून त्याचा मागोवा घेतला जात आहे.
Dr Gauri Garje Death Case: मोठी बातमी! गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण: पंकजा मुंडेंच्या पीएला अटक