Pune Palkhi 2025: पालखी सोहळ्यासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल, वाचा सर्व अपडेट सविस्तर

Pune Palkhi 2025 : पालखी सोहळा सुरळीत पार पडावा आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे जिल्ह्यातल्या वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune Palkhi 2025: पालखी सोहळ्यामुळे पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
पुणे:

Pune Palkhi 2025 : राज्यातील सर्व वारकरी संप्रदायाला आता पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीची आस लागली आहे. वारकरी संप्रदायातील महत्त्वाच्या आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज (18 जून 2025) देहूमधून प्रस्थान केले. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गुरुवारी (19 जून 2025) आळंदीहून प्रस्थान करेल. या दोन्ही पालख्या पुणे जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहेत. 

पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतुकीचे नियोजन आणि पर्यायी मार्गांबाबत महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. पालखी सोहळा सुरळीत पार पडावा आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामीण भागातील प्रमुख मार्गांवर बदल करण्यात आले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

Pune Palkhi 2025:  संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी वाहतुकीमध्ये बदल

22 ते 24 जून 2025: पुणे ते सासवड दरम्यान दिवे घाट आणि बोपदेव घाटातून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या काळात वाहनांनी खडी मशीन चौक-कात्रज-कापूरबावडी या मार्गाचा वापर करावा. सासवडहून पुण्याकडे येणारी वाहतूक गारदे- खेड शिवापूर मार्गे वळवण्यात येईल.

24 ते 25 जून 2025: पालखी जेजुरी आणि वाल्हे येथे थांबणार असल्याने, पुणे ते निरा दरम्यानची वाहतूक झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे-मोरगाव-निरा मार्गे वळवण्यात येईल. त्याचबरोबर उलट्या दिशेनेही हाच मार्ग असेल.

Advertisement

26 जून 2025: पालखी लोणंद येथे मुक्कामी असताना, पहाटे 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सासवड-जेजुरी-वाल्हे- निरा मार्गावरील वाहतूक मोरगाव मार्गे वळवण्यात येईल.

26 ते 28 जून 2025: पालखी लोणंदहून फलटणकडे प्रस्थान करेल. या काळात पुणे ते फलटण/लोणंद दरम्यानची सर्व वाहने शिरवळ मार्गे वळवण्यात येतील.

Advertisement

( नक्की वाचा : Pune Palkhi 2025 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण; कसा असेल पालखीमार्ग, पाहा वेळापत्रक )

Pune Palkhi 2025:  संत तुकाराम महाराज पालखीसाठी वाहतुकीमध्ये बदल

23 जून 2025: पालखी लोणी काळभोरहून यवतकडे मार्गस्थ होईल. पुणे ते सोलापूरकडे जाणारी वाहतूक वाघोली-केसनंद- राहु- पारगाव- चौफुला मार्गे वळवण्यात येईल. सोलापूरहून पुण्याकडे येणारी वाहतूक याच्या उलट्या मार्गाने जाईल.

24 जून 2025: यवतहून वरवंडकडे जाताना, पुणे ते सोलापूरची वाहतूक थेऊर फाटा – केसनंद – राहु – पारगाव – न्हावरे – काष्टी – दौंड – कुरकुंभ मार्गे वळवण्यात येईल.

Advertisement

25 जून 2025 : पालखी बारामती तालुक्यातील उंडवडी येथे मुक्कामी असताना, बारामती ते पाटस आणि दौंडकडे जाणारे मार्ग बंद राहतील. वाहतूक भिगवण आणि सुपे मार्गे वळवण्यात येईल.

26 जून 2025: पालखी बारामती शहरात पोहोचल्यावर, बारामती – पाटस आणि बारामती – दौंड रस्ते मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील. पर्यायी मार्ग म्हणून भिगवण मार्गाचा वापर केला जाईल.

27 जून 2025 : संसार येथे पालखीचा मुक्काम असल्याने, जंक्शन ते बारामती दरम्यानच्या रस्त्यावर परिणाम होईल. वालचंदनगर आणि इंदापूरहून येणारी वाहतूक कळस मार्गे वळवण्यात येईल.

28 ते 29 जून 2025: पालखी संसारहून निंबगाव केतकी आणि नंतर इंदापूरकडे जाईल. या काळात बारामती ते इंदापूर दरम्यानची सर्व वाहतूक कळंब – बावडा – भिगवण किंवा कळस मार्गे वळवण्यात येईल.

30 जून 2025: अकलूज ते बारामती दरम्यानची वाहतूक अकलूज-बावडा -नातेपुते मार्गे वळवण्यात येईल. इंदापूरमधील जुना पुणे-सोलापूर रस्ता बंद राहील. वाहने मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक बायपास मार्गे जातील.

1 ते 3 जुलै 2025:  इंदापूर आणि सरडे दरम्यान इंदापूर-अकलूज रस्ता बंद राहील. वाहतूक हिंगणगाव-टेंभुर्णी-गणेशगाव-मालीनगर -अकलूज मार्गे आणि उलट्या दिशेने वळवण्यात येईल, किंवा नातेपुते-वालचंदनगर-जंक्शन- भिगवण मार्गे जाईल.

वाहतुकीमधील या बदलाचा उद्देश हा दोन्ही पालख्यांना सुरळीत मार्गक्रमण करता यावं. वारकरी तसेच सामान्य प्रवाशांची सुरक्षितता निश्चित व्हावी हा आहे. सर्वांनी याबाबत सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. 

( नक्की वाचा : Ashadhi Wari: देहूनगरीत पार पडला संत तुकाराम महाराजांचा 340 वा पालखी प्रस्थान सोहळा )