रेवती हिंगवे, पुणे:
Pune Municiple Corporation Election 2026: महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर नागरिकांनी मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे राज्यभरातील अनेक मतदार केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. पुण्यामध्येही ईव्हीएमचा असाच घोळ पाहायला मिळाला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी आक्षेप नोंदवला आहे.
ईव्हीएममध्ये बिघाड... अंकुश काकडेंचा आक्षेप
तब्बल ९ वर्षानंतर होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी पुणेकर आज मतदान करत आहेत. पुणे शहरात 41 प्रभागातून 165 नगरसेवक निवडण्यासाठी मतदान होणार आहे. आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनीही ईव्हीएमच्या कार्यप्रणालीवर आक्षेप नोंदवला आहे.
Navi Mumbai News : मतदार यादीत वनमंत्र्यांचं नाव सापडेना! या केंद्रावरुन त्या केंद्रावर पळापळ..
अंकुश काकडे यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकवेळी बटण दाबल्यानंतर लाईट लागते मात्र तीन मतदान केल्यानंतर चौथा मतदान झालं तेव्हा लाईट लागला नाही, त्यामुळे मतदान योग्य पद्धतीने झाले नाही. तसेच ईव्हीएम मशीनमध्ये दाखवत असलेली वेळ ही सात वाजून 44 मिनिट म्हणजे 14 मिनिट जास्त दाखवत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
नाशिकमध्ये ईव्हीएम बंद..
दुसरीकडे, पुणे नाशिकमध्ये ईव्हीएम मशिन्स बंद पडल्याच्याही तक्रारी समोर आल्या आहेत. पुण्यामध्ये सेंट हिल्डज स्कूल गुरुवार पेठ येथे मशीनमधील बिघाडाने मतदान प्रक्रिया सुरु झाली नसल्याचे चित्र आहे. मशीन बदलून देण्याची प्रक्रिया सुरू असून मतदानाचा पहिला तास वाया गेल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला आहे. नाशिकमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये मतदानाच्या सुरुवातीलाच EVMमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक २४ मधील मॉडर्न हायस्कूलच्या खोली क्रमांक ८ मध्ये मतदानाला अद्याप सुरुवात नाही.
Nagpur News : भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात पोहोचले!
जळगावमध्येही गोंधळ..
जळगाव शहरात मतदान सुरू होण्यापूर्वी एका मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक १५ येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मांडणीचा क्रम चुकल्याचा आरोप उमेदवार प्रतिनिधींनी केला. ईव्हीएम मशीनचा मांडणीचा क्रम नियमांनुसार नसल्याने तो तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी उमेदवार प्रतिनिधींनी केली. यावरून निवडणूक कर्मचारी आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळाने निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत उमेदवार प्रतिनिधींची मागणी मान्य केली आणि ईव्हीएम मशीनचा क्रम पुन्हा योग्य पद्धतीने लावण्यात आला.