Tamhini Ghat Thar Accident Rescue Operation: नवी थार घेऊन पुण्याहून कोकणात फिरायला निघालेल्या सहा मित्रांचा ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा तरुणांचा दुर्दैवी अंत झाला. रात्री दीड ते दोनच्या सुमारास वळणाचा अंदाज न आल्याने गाडी तब्बल 500 फूट खोल दरीत कोसळली. धक्कादायक म्हणजे दोन दिवसांनी या अपघाताची माहिती मिळाली. ड्रोन, लोकेशनच्या माध्यमातून ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. मात्र पोलिसांसह कुटुंबियांनी त्याचा शोध कसा घेतला? खोल दरीत कार असल्याची माहिती बचाव पथकांना कशी मिळाली? जाणून घ्या सविस्तर...
नव्या गाडीने ट्रीप, घाटात भयंकर घडलं!
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील 18 ते 22 वयोगटातील सहा युवक थार गाडी घेऊन त्यांच्या घरातून 17 नोव्हेंबरला पर्यटनासाठी निघाले होते. रात्री दीड ते दोनच्या दरम्यान वाहन गाडीवरील ताबा सुटल्याने कार दरीत कोसळली. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून सर्व तरुण पुणे जिल्ह्यातील कोंडवे कोपरे गावातील राहणारे आहेत.
या तरुणांपैकी साहील गोठे याने 20 दिवसांपूर्वीच नवी थार घेतली होती. आपल्या थार गाडीतून मित्रांना कोकण फिरवायचा प्लॅन त्यांनी केला. सर्वजण सोमवारी रात्री उशिरा कोकणात जाण्यासाठी निघाले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळपासूनच त्यापैकी कोणाचाही कुटुंबियांशी संपर्क होत नव्हता, त्यामुळे सर्वजण चिंतेत होते. मुले हरवल्याची तक्रारही त्यांनी पोलिसांकडे केली.
या फिरायला जाणाऱ्या तरुणांनी तीन दिवस कोकणात राहण्याचा प्लॅन केला होता, त्यासाठी त्यांनी आधीच रुम बुक केली होती. मात्र मुले वेळेवर न पोहोचल्याने हॉटेल मालकाने त्याच्या मित्रांना फोन केला, त्यामुळे मित्र पोहोचले नाहीत याची खात्री पटली आणि शोध सुरु झाला. मित्रांनी पोलिसांनाही याबाबतची माहिती दिली.
ड्रोन, मोबाईलचे लोकेशन.. असा लागला तपास!
माणगाव पोलिसांनी तपासमोहिम राबवत मुलांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन तपासले. तेव्हा ते ताम्हिणी घाटात असल्याचे सिग्नल मिळाले. पोलिसांची टीम ताम्हिणी घाट परिसरात पोहोचली, मात्र त्याठिकाणी कोणतीही गाडी दिसत नव्हती. अखेर पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने खोल दरीत तपास सुरु केला. यावेळी ड्रोनच्या माध्यमातून गाडी आणि चार मृतदेह दिसले तेव्हा सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.
गाडी व मृतदेह हे खूप खोल दरीमध्ये असल्यामुळे शोधकार्य खूपच कठीण झालं होते. माणगाव पोलिस, रायगड आपत्ती व्यवस्थापन, मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्व मृतदेहांचा शोध घेण्यात आला. या अपघातात थार गाडीचा अक्षरश: चुराडा झाला तर गाडी ज्या लोखंडी खांबाला धडकली त्याचेही तुकडे पडलेत. या दुर्घटनेने पुण्यासह रायगड जिल्हा हादरुन गेला आहे.