Tamhini Ghat Thar Accident: नव्या कोऱ्या थार गाडीतून कोकणात फिरायला निघालेल्या सहा मित्रांचा ताम्हिणी घाटात दुर्दैवी अंत झाला. ताम्हिणी घाटामध्ये ५०० फूट खोल दरीत गाडी कोसळली. या दुर्घटनेत सहाही मित्रांचा जीव गेला. कुटुंबियांकडून या सर्वांचा शोध सुरु होता. दोन दिवसांनी ड्रोनच्या माध्यमातून ताम्हिणी घाटात शोध घेताना गाडी दिसली अन् अपघाताची भयंकर घटना उघडकीस आली. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सहा मित्र, कोकण ट्रीप.. घाटात शेवट
समोर आलेल्या माहितीनुसार, अवघ्या 20 दिवसांपूर्वी खरेदी केलेली नवीन कोरी थार कार घेऊन पुण्यातील सहा तरुण कोकणात फिरण्यासाठी निघाले होते. मात्र ताम्हिणी घाटातील एका वळणावर त्यांचा घात झाला अन् सहाही जणांचा प्रवास जागीच संपला. दोन दिवस शोधाशोध केल्यानंतर खोल दरीत गाडीचा तुकडा दिसला ज्यानंतर तपासाला वेग आला आणि सहाही जणांचे मृतदेह सापडले.
Raigad Tamhini Accident: थार गाडी 500 फूट दरीत... रायगडमध्ये भीषण अपघात! 4 जणांचा मृत्यू
पुणे जिल्ह्याच्या कोंडवे कोपरे गावातील तरुण साहिल गोठे (वय 24), शिवा माने (वय 20), प्रथम चव्हाण (वय 23), श्री कोळी (वय 19) , ओमकार कोळी (वय 20) पुनीत शेट्टी (वय 21) हे सहा तरुण कोकणात फिरायला निघाले होते. १८ तारखेला रात्री १ वाजण्याच्या सुमारास हे सर्व तरुण नव्या गाडीने कोकणाकडे निघाले.
दोन दिवसांनी समजलं सत्य..
त्याच दिवशी पहाटेच्या सुमारास ताम्हिणी घाटातील एका वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट 500 फूट खोल दरीत कोसळली. मुलांशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी, मित्र परिवाराने शोधाशोध सुरु केली. पोलिसांनाही कळवले. पोलिसांच्या मदतीने त्यांचे अखेरचे लोकेशनही घाटात असल्याचे समजले. मात्र त्याठिकाणी कोणीही नव्हते.
अखेर ड्रोन सोडून ड्रोनच्या सहाय्याने दरीमध्ये तपासणी करण्यात आली. या तपासणीवेळी गाडीचा तुकडा दिसला. त्यानंतर शोध पथकांच्या मदतीने शोध घेण्यात आला असता गाडीमध्ये तरुणांचे मृतदेह सापडले. बचाव पथक दोरखंड, क्रेन आणि इतर उपकरणांच्या मदतीने गाडीसह तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन दिवसांनी या अपघाताची माहिती समजल्यानंतर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.