योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोल्याच्या पातुर तालुक्यातील शिर्ला येथील भंगार विक्रेते हुसेन शहा यांच्या कुटुंबातील रोशन शहा हुसेन शहा या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत राज्यात १८ वा क्रमांक मिळवत अद्भुत यशाची नोंद केली आहे. घराचा आर्थिक भार घेणं कठीण जात असताना भंगार विक्रीतून मिळणारी तुटपुंजी रक्कम, दोन बहिणींचे शिक्षण आणि रोशनचा खर्च या सर्वांचा प्रचंड ताण रोशनच्या वडिलांवर होता. मात्र रोशनसह कुटुंबाने हार मानली नाही. जिद्द आणि चिकाटीने रोशनने मोठं यश मिळवलं.
या यशापर्यंत रोशनने अनेकांची मदत मिळाली. दहावीमध्ये ९२.४५ टक्के गुण मिळवल्यानंतर वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात दिला. यामुळे अमरावती पॉलिटेक्निक आणि जळगाव इंजिनिअरिंग कॉलेजच्या खर्चाचा भार कमी झाला. महाज्योती अभियानांतर्गतही फेब्रुवारी 2025 पासून शासनाची मदत मिळाली आणि रोशनने कठीण परिस्थितीतही अभ्यासाला न्याय दिला.
राज्यात १८ वा क्रमांक; गावभर जल्लोष; विजयी मिरवणुकीने रोशनचा सत्कार..
महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या १९ नोव्हेंबरला आलेल्या निकालात रोशनने राज्यात १८ वा रँक पटकावत जलसंधारण अधिकारी पदाकडे वाटचाल निश्चित केली. अकोल्याच्या रोशनच्या या घवघवीत यशाची माहिती शिर्ला गावात पोहोचताच गावकरी, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्याच्या घरी पोहोचले. उपसरपंच कल्पना खरडे, कर्मचारी हेमंत घूगे, अंबादास इंगळे, सामाजिक कार्यकर्ते निखिल खंडारे आणि रामकृष्ण सावंत विद्यालयाच्या शिक्षकांनी रोशनचा सत्कार केला. गावकऱ्यांनी रोशनची विजयी मिरवणूक काढत गावभर जल्लोष केला. गेल्या वर्षी केवळ दहा गुणांनी संधी हुकल्यानंतर रोशनने हार न मानता आणखी जोमाने अभ्यास केला आणि यंदा उज्ज्वल यश मिळवले.
नक्की वाचा - Pune News: माणुसकीने मन जिंकलं! कचऱ्यात सापडले 10 लाख, मावशीने जे केलं ते ऐकून सॅल्यूट ठोकाल
शिरल्याचे ‘तीन' क्लास वन अधिकारी - पेनाची ताकद जगासमोर मांडणारा रोशन
शिर्ला गावासाठी यंदा अभिमानाची बाब म्हणजे एकाच वर्षी तीन युवक क्लास वन अधिकारी झाले आहेत. राजेंद्र घुगे, प्रतीक पारवेकर या मामा भाच्यांनी एमपीएससी परीक्षेत येऊन शिर्ला गावचे नाव रोशन केलं आणि आता 'रोशन शहा' या तरुणांन यामध्ये भर टाकून शिर्ला गावाचं नावलौकिक केलं. दरम्यान शिर्ला सारख्या खेडेगावच्या ग्रामीण भागातील या तिघांनीही प्रतिकूल परिस्थितीत कठोर मेहनत करून यश मिळवले. रोशन यांनी शिक्षणासाठी काही वेळा वृत्तपत्र विक्री केली होती, ही माहिती गावकऱ्यांना प्रेरणादायी ठरली आहे. तर दुसरीकडे “वृत्तपत्रात माझी बातमी छापली नसती, तर कदाचित आज अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले असते,” असे रोशनने भावुक होत सांगितले. “आजची तलवार ही पेन आहे; युवकांनी पेन कधीच हातातून सोडू नये,” असा संदेश देत रोशनने आपल्या यशाचा मान गावकऱ्यांना, आई-वडिलांना आणि मदत करणाऱ्या सर्वांना दिला. शिरल्याचा हा अभिमानाचा क्षण अकोला जिल्ह्यासाठीही गौरवशाली ठरला आहे.